बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*धर्म 10

बुद्ध म्हणाला, "भिक्षु हो, प्राचीन काळीं या श्रावस्ती नगरींतच एक वैदेहिका नांवाची कुलीन स्त्री राहत होती. ती गोड बोलणारी आहे, नम्र आहे व ती फार शांत आहे, अशी तिची सर्व शहरांत ख्याति होती. भिक्षु हो, त्या वैदेहिकेची एक परम दक्ष आणि उद्योगी काली नावाची दासी होती. एके दिवशीं त्या दासीच्या मनांत अशी शंका आलीं कीं, ही माझी धनीण खरोखरच शांत वृत्तीची आहे, किंवा मी वेळच्या वेळी कामें  करीत आहें म्हणून तिला रागावण्याला संधिच सांपडत नाही? या शंकेच्या समाधानानें आपल्या मालकिणीची परीक्षा पाहण्याचा तिनें बेत केला व ती एके दिवशीं जरा उशीरा उठली. तेव्हां ती वैदेहिका तिला म्हणाली, ‘काय ग काली, आज इतका उशीर कां केलास?’ तेव्हां काली म्हणाली, ‘बाईसाहेब, सहज उशीर झाला.’वैदेहिकेनें कपाळाला आंठय़ा घालून व भृकुटी वर चढवून म्हटलें, ‘कसली ही पापी दासी! उशीरा उठते म्हणजे काय?’ कांही दिवस गेल्यावर काली दासी आणखी थोडासा उशीर करून उठली. त्या दिवशीं बाईसाहेबांनी तिला बर्‍याच शिव्या दिल्या. आणखी कांही दिवस गेल्यावर बाईसाहेबाची पुन: एकदा परीक्षा पहावी म्हणून कालीनें उठण्यास फारच उशीर  केला. मग काय विचारतां! बाईसाहेबांचा क्रोधअग्नि एकदम भडकला. तिनें जवळ पडलेली लोखंडाची  खीळ घेऊन ती कालीच्या डोक्यांत घातली. काली बिचारी घाबर्‍याघुबर्‍या आरडत ओरडत रस्त्यावर धांवली. तेथें शेजारीपाजारी गोळा झाले, व त्यांनी कालीला काय झालें, तिच्या डोक्यांतून रक्त का वाहते वगैरे चौकशी करण्यास आरंभ केला. तेव्हां काली त्यांना म्हणाली, ‘आपण ज्यांना मोठय़ा शांत समजत होतां, त्या आमच्या बाईंसाहेबांचें हे कृत्य आहे!’ या कृत्यानें, ही स्त्री साध्वी दिसत होती, पण ती साध्वी नव्हे, ही मोठी क्रूर आहे, अशी वैदेहिकेची शहरभर अपकीर्ति पसरली.

"भिक्षु हो, त्या कुलीन स्त्रीप्रमाणेंच कांहीं भिक्षु, जोंपर्यंत कटु शब्द ऐकण्याचा प्रसंग आला नाही तोपर्यंत, मोठे शांत दिसतात. परंतु जेव्हा एखाद्या भिक्षुवर कटु शब्दांचा प्रहार होतो, तेव्हा तो खरोखरच शांत आहे कीं नाहीं, हें जाणण्याची पाळी येते.. भिक्षु हो, कोणी तुम्हाला वेळ पाहून बोलेल, कोणी अवेळी बोलेल, कोणी तुमच्या हातून झालेला अपराध सांगेल, कोणी तुमच्यावर नसता आळ घालील, कोणी तुम्हाला मृदु शब्दांनी बोलेल, कोणी कठोर शब्दांनी बोलेल, कोणी प्रेमभावानें बोलेल आणि कोणी द्वेषभावानें बोलेल. या सर्वाविषयी आपलें मन विकृत होणार नाहीं, अशी तुम्हीं खबरदारी घेतली पाहिजे; तुमच्या तोंडांतून वाईट शब्द निघूं नयेत अशाबद्दलहि तुम्ही सावध असलें पाहिजे; आणि ज्यानें आपल्यावर वाग्बाणांचा प्रहार केला असेल त्यावरचल प्रेम करूं लागून तेथून सर्व जगाविषयी प्रेमभाव उत्पन्न करण्यास तुम्हीं शिकलें पाहिजे. जरी दृष्ट चोरांनी करवतीनें तुमचें डोकें कापलें, तरीदेखील तुम्ही रागावता कामा नये. अशा प्रसंगी जो रागावेल तो माझा शिष्य होण्यास लायक नाहीं. त्या चोरांवर देखील तुम्हीं प्रेम करावें; व त्यांना निमित्त करून सर्वं प्राणिमात्रांविषयीं तुमच्या अंत:करणांत प्रेमभाव उत्पन्न व्हावा."

साधुसंतांच्या उदाहरणानें आणि उपदेशानेंहि आपल्या मनांतील क्रोधशल्य उपटून काढण्याचा प्रयत्न करावा. एकनाथ, तुकाराम इत्यादि सत्पुरुषांनी अनेक प्रकारें खलांनी केलेला छळ सहन करून आपली शांतवृत्ति कायम ठेविली हें उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर असतां एवढ्या-तेवढ्यांसाठी मी दुसर्‍यावर रागावतों, व कोणी लहानसहान अपराध केला असतां त्याचा सूड उगविण्याची दुष्ट वासना उराशी घट्ट धरून बसतो, हें काय? या कुबुध्दीचा मीं त्याग न केला तर-