बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध


*धर्म 11

ऐसें भाग्य कईं लाहाता होईन। अवघें देखे जन ब्रह्मरूप।।
मग तया सुखा अंत नाहीं पार। आनंदे सागर हेलावती।।


अशा सुखाचा मी अनुभव घेऊं शकेन काय? अशा रीतीनें विचार करून मनांतील वैरभाव नष्ट करावा, व प्रेमभावना परिपूर्ण करावी. या भावनेनें तीन ध्यानें साध्या होतात. शिवाय आणखीहि बरेच फायदे या भावनेमुळें होत असतात. शांतिदेवाचार्‍यानी म्हटलें आहे:-

प्रासादिकत्वमारोग्यं प्रामोद्यं चिरजीवितम्।
चक्रवर्तिसुखं स्फीतं क्षमी प्राप्नोति संसरन् ।।


या संसारांत क्षमावान् मनुष्याला सौंदर्य, आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि चक्रवर्तिराजासारखें विपुल सुख प्रश्नप्त होतें.

३ मरणस्मृति

मोहचरिताला मरणग्मृतिकर्मस्थान योगारंभी पथ्थकारक होतें. त्याचें विधान :-

पवातदीपतुल्याय सायुसंततिया खयं।
परुपमाय संपस्सं भावये मरणस्सतिं।।


वार्‍याच्या झोतावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणें आपल्या आयुष्याचा नाश होत चालला आहे, हें इतरांच्या उदाहरणानें जाणून मरणस्मृति वाढवावी (मरणाचें चिंतन करावें.)

महासंपत्तिसंपत्ता यथा सत्ता मत्ता इध ।
तथा अहं मारस्साभि मरणं मम हेस्सति।।


ज्यांनां मोठी संपत्ति प्राप्त झाली होती, ते पुरुषहि या जगांतून जसे नाहीसे झाले, तसा मीहि (कधींना कधीं) मरणार आहें. मरण हें मला येणारच!

ईसकं अनिवत्तन्तं सततं गमनुस्सुकं।
जीवितं उद्या अत्थं सुरियो विय धावति।।


सूर्य जसा उदयापासन अस्तापर्यंत सारखा धावत असतो, तसें गमनाला अत्यंत उत्सुक जीवित थोडेसेंहि मागें न सरतां धावत आहे!

अशा रीतीनें मरणाचें निर्भयपणे चिंतन केलें असतां आळस नष्टप्रश्नय होऊन जातो. या मरणस्मृतिकर्मस्थानानें उपचार समाधिच साधते; अर्पणा समाधि साध्य होत नाहीं, तथापि आळश नष्ट होऊन अंत:करणांत जागृति उत्पन्न झाल्यामुळें मनुष्य कर्तव्यदक्ष होतो व इतर कर्मस्थानांच्या योगें अर्पणासमाधि साधण्यास समर्थ होतो.