कोठें आहे सोन्यामारुति ?
सोन्यामारुति, सोन्यामारुति! दोन वर्ष सोन्यामारुति गाजून राहिला आहे. चैत्राचा महिना आला कीं सोन्यामारुतींचें नाव ऐकू येऊं लागते. वसंतऋतूंत वठून गेलेल्या वृक्षांना पालवी फुटते. त्याप्रमाणे या वसंतऋतूंत वठून गेलेल्या सोन्यामारुतिप्रकरणला पालवी फुटत असते. वर्षभर सारें सामसूम असतें. वर्षभर जो तो आपपल्या कामांत दंग असतो. सारे धर्माभिमानी खान-पान-गान यांत तन्मय झालेले असतात. परंतु चैत्र महिना उजाडतांच हृदयांत सोन्यामारुति जागा होतो. ओंठावर सोन्यामारुति हे शब्द उड्या मारूं लागतात. वर्तमानपत्रांत-पवित्र सनातनी वर्तमानपत्रांत-सोन्यामारुतीचे बुभु:कार ऐकूं येऊं लागतात.
निवडणुकीच्या दंगलींत सोन्यामारुतीचें सुंदरकांड बरेच वेळां वाचण्यांत येत असे. पुण्याला निवडणूक म्हणजे सोन्यामारुति असेंच जणूं होऊन गेलें होतें. ''सोन्यामारुतीचा अभिमान असेल तर मला मत द्या. सोन्यामारुतीला स्मरा व मला फशी पाडूं नका. सोन्यामारुतीसमोरची माझी तेजस्वी मूर्ति आठवा व मला विधिमंडळांत तेथें सोन्यामारुतीसारख्या प्रकरणांत अटीतटीनें भांडण्यासाठीं निवडून पाठवा. मी म्हणजे सोन्यामारुति. मी म्हणजे सोट्या म्हसोबा. मी म्हणजे सारीं हिंदूंची देवळें व मंदिरें. मी तुळशीबाग व पर्वती. मी आळंदी व पंढरपूर. मी काशी-रामेश्वर. मी द्वारका-जगन्नाथपुरी. मी शिरापुरी नाहीं. शिरापुरीचे भोक्ते अन्य आहेत. मी सोन्यामारुतीचा उपासक. सोन्यामारुतीचा पाईक. सोन्यामारुति म्हणजे एक प्रतीक आहे. मी सोन्यामारुतीचा म्हणजे या चार हात लांबीरुंदीच्या मंदिरापुरताच आहें, असें नाहीं. मंदिर गगनचुंबी असो वा एखाद्या भिंतींतील कोनाड्यांत असो, त्या सर्वांचा मी संरक्षक आहें. त्या सर्व दगडी मंदिरांवर संकट येणें म्हणजे माझ्या प्राणांवर संकट येणें होय. मला तुम्ही निवडा. धर्ममय ज्याचे प्राण आहेत, धर्ममय ज्याचें घटकापळ चाललें आहे, अशा माझ्यासारख्या धर्मात्म्याला, धर्मंवीराला, धर्मशौंडाला सारी मतें द्या. माझा विजय म्हणजे तो या सोन्यामारुतीचा विजय! आणि सोन्यामारुतीचा विजय म्हणजे सार्या दगडी तेहतीस कोटी देवांचा विजय!'' असा प्रचार होत असे.