सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 6

पहिला : अहो, आपण जर पुण्याच्या प्रमुखाकडे गेलों व म्हटलें, ''आम्हीहि येतों सत्याग्रहाला !'' तर ते हंसतील व म्हणतील, ''वेडे आहांत तुम्ही; अहो, हजारों नकोत जायला! कांही गेले म्हणजे पुरेत. गांधींचा बावळटपणा आम्हांला करायचा नाहीं. दोन गेले काय, लाख गेले काय, अशानें स्वराज्य मिळत नसतें. हा पक्षाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. पुढच्या निवडणुकीची ही पूर्व-सज्जता आहे. तोंडांनीं सर्वजण म्हणत रहा, ''सोन्यामारुतीचा निकाल लागला पाहिजे. एरव्हीं आम्हांला चैन पडणार नाहीं'' बस्स. येथीलहि विद्वान् व राजकारणी मंडळी असेंच परवां म्हणाली. येथून दोघांतिघांना पाठवणार आहेत पुण्याला. प्रत्येक ठिकाणचे एकेक, दोनदोन प्रतिनिधी पाठवून हा लढा लढला जाणार आहे. फार खर्च नको. फार व्याप नको. सुटसुटीत काम.

दुसरा : तुम्ही पुण्याला नकाच जाऊं. अहो, वेळ आहे, प्रसंग आहे. आणि आपणांपेक्षां किती तरी लोक पडले आहेत. धर्माच्या रक्षणाला माणसांची वाण पडत नसते. माझ्या बापूला मात्र उद्यां तार करतों.

पहिला
: मी येथेंच राहणार आहे. तुम्ही आहांतच. दुपारीं येत जा. खेळूं.

दुसरा
: बापू आला कीं आइस्क्रीम करूं एकदां. तुमच्याकडे आइस्क्रीम-पॉट आहे ना ?

पहिला
: हो आहे. त्या दिवशीं आमच्याकडे केलें होतें. चांगली आठवण
राहिली आहे.

दुसरा : कशाची ?

पहिला
: तें आइस्क्रीम-पॉट मोलकरीण घासणार होती. तिनें तें बाहेर नेलें. तिचा लहान सात-आठ वर्षांचा पोर आला व तें पॉट आपला तो चाटूं लागला. बोटें घालून घालून चाटूं लागला! मी तें पाहिलें. मला राग आला. भांड्याला बोटें लावावयाचीं! तींच तींच बोटें! 'तुझीं पोरें येथें आणीत नको जाऊं' असें मीं मोलकरणीला बजावलें. तिनें पोराला मारलें.

दुसरा : शेफारवून ठेवतात पोरांना. मला लाड नाहीं आवडत. स्वाभिमान शिकविला पाहिले. आमची बबी कोणाकडे कांहीं घेणार नाहीं.

पहिला : आपण भिकारी झालों तरी स्वाभिमान नाहीं गमवतां कामा! स्वाभिमान हेंच माणसाचें खरें धन.

दुसरा : बापू आला म्हणजे बरें होईल. आइस्क्रीम करूं.

पहिला : तुमचा बापू बी. ए. झाला ना ?

दुसरा : झाला. पंरतु नोकरी आहे कोठें ? सतरा ठिकाणीं गेला. ब्राह्मणाला मुळीं स्वच्छ नाहीं म्हणतात! स्वाभिमानी ब्राह्मणाला कोण देणार नोकरी ? त्या दिवशीं कलेक्टरच्या मुलाखतीला मुद्दाम नवीन सूट घालून गेला. त्याला म्हटलें 'नीट सजून जा. देवाच्या दर्शनाला बावळटासारखे जाऊं नये.' हॅट, बूट, नेकटाय, सारें होतें. हातांत रिस्टवॉच होतें. नाकावर चष्मा होता. परंतु शेवटीं साहेबानें नकार दिला. पुण्याला त्यासाठींच गेला आहे. कोठें तरी नोकरी लागल्याशिवाय लग्नहि करतां येत नाही.

पहिला : मुलगी ठरली आहे वाटतें ?

दुसरा : हो, जवळजवळ सारें ठरल्यासारखें आहे. परंतु मुलीचा बाप म्हणतो, ''नोकरी नसलेल्याला मुलगी देणें स्मृतींच्या विरुध्द आहे. आधीं नोकरी लागूं दे, मग बार उडवूं.''