सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 9

ती मूर्ति वसंतासमोर येऊन उभी राहिली. न कळत वसंता त्या मूर्तीच्या पायां पडला. त्या मूर्तीनें वसंताला उचलून हृदयाशीं धरिलें. वसंताची भीति गेली. तो पवित्र स्पर्श होतांच वसंता पुलकित झाला. त्याच्या अंगावर भक्तिप्रेमाचे रोमांच उभे राहिले. भीतीचा निरास झाला व मोकळेपणा उत्पन्न झाला. वसंता बोलूं लागला.

वसंता : तुम्ही कोण ?

''मी वेदपुरुष !'' ती मूर्ति म्हणाली.

''वेदपुरुष ?'' वसंतानें आश्चर्यानें विचारिलें.

''होय बाळ.''

वसंता : तुम्ही कोठून आलेत ?

वेदपुरुष : मी सर्वत्र असतों. परंतु कोणाला दिसत नाहीं. तुझ्यासाठीं मी हें दृश्य रूप धारण केलें आहे.

वसंता
: वेदपुरुष म्हणजे काय ?

वेदपुरुष
: मी ज्ञानरूप आहे. विचार हें माझें रूप. स्वच्छ विचार देणें हें माझें काम. मी हळूहळू सर्वांच्या हृदयांत स्वच्छ विचार निर्माण करीत असतों.

वसंता : फार कठीण असेल नाहीं हें काम ?

वेदपुरुष
: लोकांना स्वच्छ विचार नको असतो. एकेक गोष्ट समजण्याला दहादहा हजार वर्षे कोणी कोणी घेतात !

वसंता : तुम्ही निराश नाहीं होत ?

वेदपुरुष
: नाहीं. माझी आशा अनन्त आहे. आज ना उद्यां, दहा हजार वर्षांनीं, परार्ध वर्षांनीं मनुष्याला निर्मळ दृष्टि येईल, तो विचारानें वागेल, शुध्द बुध्दीनें वागेल, अशी मला आशा आहे. नदी शेवटीं सागराकडे जाणार, मनुष्य शेवटीं मंगलाकडेच येणार.

वसंता : तुम्हीं आज माझ्यावर कां कृपा केलीत ?

वेदपुरुष
: तुझी तळमळ बघून. जेथें खरी तळमळ असेल तेथें मी धांवून जातों. खरें काय हें शोधण्याला ज्याचा आत्मा तडफडत असतो, त्याच्यासाठीं मी धांवून येतों. ध्रुवाला ज्ञानाची केवढी तळमळ! मीं त्याच्या गालाला स्पर्श केला व त्याला निर्मळ ज्ञान दिलें.

वसंता : होय, मलाहि तळमळ आहे. सत्य काय तें शोधून त्याच्यासाठी जगावें, मरावें, असें मला वाटत असतें. परंतु या जगांत सारा सांवळागोंधळ आहे. खरें ज्ञान जणूं लपलेंलें असतें. आणि विशेषत: धर्माचें ज्ञान तर फारच गहनगूढ आहे. सारे धर्माच्या नांवाने ओरडतात! खरा धर्म कोंठें आहे ?