सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 18

दगडू : त्यांच्या देहाला उन्हाळा कसा मानवेल ? परंतु आपल्यासाठीं या झोंपड्या कशा छान बांधल्या आहेत नाहीं ?

हरि : दुपारच्या वेळीं हे पत्रे असे तापतात कीं क्षणभरहि बसवत नाहीं. तिकडे यंत्राजवळ आपण शिजत असतों. येथें पत्र्याखालीं लहान मुलें शिजत असतात.

शिवा : त्या दिवशीं त्या पार्वतीचा मुलगा उन्हानेंच मेला. नऊ महिन्यांचा होता. सोन्यासारखा मुलगा उन्हांत करपून गेला.

खंडू : नवरा कामावरून आला तों मुलगा मेलेला. पांडू दारांतच मटकन् बसला. त्याच्यानें बोलवेना, रडवेना. पार्वतीनें हंबरडा फोडला.

बन्सी : पण शेटजींच्या कानांवर तो गेला का ?

हरि : त्यांच्या कानांत हे हंबरडे शिरत नाहींत. संस्कृति, तत्वज्ञान, धर्म यांच्या कथा त्यांच्या कानांत शिरत असतात.

दगडू : त्यांनी कोठल्याशा देवाला म्हणे पन्नास हजारांचा मुकुट करून दिला.

खंडू : आणि कोठल्या व्यायामशाळेस लाख रुपये !

शिवा : एक लाख रुपये ?

खंडू : हो, एक लाख. त्यांतून म्हणे स्वयंसेवक तयार होणार आहेत.

बन्सी : आमच्या डोक्यांत लाठ्या मारायला.

दगडू : सोन्यामारुतीच्या पुढें सत्याग्रह करायला.

खंडू : दगडांचीं देवळें सांभाळायला.

शिवराम : आमच्या माना मुरगळून तिकडे देवांना मुकुट करणार ? आमच्या घरादारांना काडी लावून तिकडे देवांची मंदिरें राखणार ? आमच्या घरीं मृत्यूच्या घंटा वाजत असतां हे सोन्यामारुतीपुढें घंटा वाजवणार ? आमचीं सोन्यासारखी मुलें उन्हानें मरत आहेत तीं मरूं नयेत म्हणून या लाखांतून सुंदर चाळी नसत्या का बांधतां आल्या ? आमच्या या लहान मुलांसाठीं कोण मंदिरें बांधणार ?

खंडू : आपणांसाठीं हीं पत्र्याचीं कबरस्थानें बांधलेलीं आहेत. आपल्या तपश्चर्येसाठीं हे पवित्र आश्रम आपणांस बांधून देण्यांत आले आहेत.

हरि : आमच्या निढळाच्या घामानें निर्माण झालेली संपत्ति आमच्या सुखासाठीं कां वापरण्यांत येत नाहीं ? जिकडून तिकडून आमचा कोंडमारा. या संपत्तीवर आपली मालकी नाहीं का ?

बन्सी : आज चोर सर्वमान्य झाले आहेत व साव चोर मानले जात आहेत. मिलच्या आवारांतील औषधासाठीं वडाचीं दोन पानें घेतलीं तर आपण चोर होतों. परंतु आपण निर्माण केलेली अपरंपार संपत्ति आपल्या डोळ्यांदेखत लुबाडणारा समाजाकडून पूजिला जातो. त्याला खूर्ची, त्याला मानपत्र, त्याचे प्राण वांचावेत म्हणून देवावर अभिषेक, देवांना प्रार्थना! आणि आमचे प्राण! प्रामाणिकपणें कष्ट करूनहि पोटाला पुरेसें न मिळाल्यामुळें तडफडणारे आमचे प्राण! त्यासाठीं कोण प्रार्थना करणार, कोण अभिषेक करणार ? कसले अभिषेक नि कसलें काय! सारा दंभ आहे. दगडांचे देव व दगडांची माणसें. माणुसकी कोठेंच नाहीं.