हरि : त्याला वाजवूं देणार नाहींत. सरकार, सावकार, सनातनी कोणी वाजवूं देणार नाहीं.
शिवराम : तो वाजवल्याशिवाय राहणार नाहीं. गंगाराम! रहिमान रडला नाहीं रे ?
गंगाराम : नाहीं. तो भेसूर हंसला. मलाहि रडूं आलें नाहीं. अरे, मजुरांची लाखों मुलें रोज अशीं मरत आहेत. कोण कुणाला रडणार ? रोज मरे त्याला कोण रडे ? गरिबानें मरणाचा आनंद मानला पाहिजे. एक पोट कमी झालें असें वाटलें पाहिजे. कोणी मेलें तर श्रीमंतांनीं रडावे. कोणी मेलें तर गरिबांनी हंसावे !
दगडू : गंगाराम! तुझें मन दगडासारखें होत आहे.
गंगाराम : एरव्हीं लंकादहन मला करतां येणार नाहीं. बरें, निजा आतां. उद्यां सभेला या.
बन्सी : चला उठा सारे.
सारे निघून गेले. फक्त हरि तेथें राहिला. दिव्यांतील तेल संपत आलें होतें. हरीनें तरट झटकलें. आणखी एक रिकामें पोतें होते, तें त्यानें झटकून घातले. दिवा न मालवतां गेला. हरि अंथरुणावर पडला.
वेदपुरुष : वसंता! तुला काळोखांत दिसतें कीं नाहीं ?
वसंता : हो, सारें दिसत आहे. उजेडांत दिसे त्यापेक्षांहि चांगलें दिसत आहे.
वेदपुरुष : त्या हरीच्या अंथरुणाजवळ तुला कांहीं दिसतें का ?
वसंता : विंचू! केवढा विंचू! आतां ?
वेदपुरुष : घाबरूं नकोस. सर्प-विंचू उशाला घेऊन गरीब झोंपत असतात. त्यांना मरणाचें भय नसतें. रस्त्यावर, धुळींत, झाडाखालीं, शेतांत, खळ्यांत, वाटेल तेथें श्रम करणारा झोंपतो. मरणाचा डर काम न करणार्याला; ऐदी श्रीमंताला. गरीब श्रमजीवी मरणाबरोबर खेळतो. मरणाबरोबर निजतो. मरण म्हणजेच त्याचा मित्र.
वसंता : आपण त्या विंचवाची नांगी धरुन त्याला फेकूं या दूर.
वेदपुरुष : या विंचवाची नांगी तेवढी विषारी नाहीं. हे विंचू पुष्कळ बरे. एखादे वेळेस नांगी मारतात व दोन-चार तास फुणफुण राहतो. परंतु या गरिबांना पिळणारे जे शेंकडों मानवी विंचू आहेत, त्यांच्या नांग्या कोण धरणार ? ते जोंपर्यत गरिबांचा पिच्छा सोडीत नाहींत, तोंपर्यंत दु:ख, शोक, मरण यांच्याशिवाय या घरांत, या झोंपड्यांत, या सोन्यामारुतींच्या मंदिरांत दुसरें काय दिसणार आहे ? तें विंचू दूर कर. ते विंचू दूर करण्यासाठीं प्रचंड घंटा वाजव. नारोशंकरी घंटा वाजव.
वसंता : आपण मधून मधून या घरांतून डोकावूं या.