आई : पुरे, पुरे बाळ. मला भीती वाटते. नको असें करुं. जेव पोटभर. आणि जरा नीज दोन प्रहरचा.
वसंता : मी निजेन. परंतु आज सायंकाळी मी जाणार आहें. मग चारपांच दिवस येणार नाहीं. चालेल ना ?
आई : तूं काल रात्रभरच नव्हतास तर मला कसें सुनें सुनें वाटत होतें.
वसंता : पण मी चार दिवसांनीं येईन. नक्की येईन. तुला माझी फारच आठवण झाली तर वार्याबरोबर निरोप पाठव. मला तो मिळेल.
आई : तूं जादूगार होत आहेस कीं काय ?
वसंता : मी काय काय नवीन शिकत आहें. नवीन गोष्टी, नवीन गाणीं, नवीन दृष्टि, नवीन सृष्टि. मी नवीन होत आहें.
आई : जेव आधीं. गप्पाच तुझया भारी, वसंता! आज तुझें तोंड किती गोड दिसत आहे !
वसंता : मी चार दिवशीं आलों म्हणजे आणखी गोड दिसेन. तूं माझ्याकडे पहातच राहशील.
आई : कोणाची दृष्टहि पडायची.
वसंता : तुझ्या मुलावर नाहीं दृष्ट पडायची.
आई : ताक हवें का ?
वसंता : नको. आतां मी हात धुऊन निजतों.
वसंता शांतपणे झोंपला. किती तरी वेळ त्याला जाग आली नाहीं. परंतु सायंकाळच्या भुंग्यानें तो जागा झाला.
आई : झाली का रें झोंप ?
वसंता : हों, आतां मी जातो. चार दिवसांनी येईन. जातों हां आई.
एकदम वसंता अदृश्य झाला. आई इकडे तिकडे पहात होती. वसंता हसूं लागला. त्यानें आईच्या कानांत कुर्र केलें.
आई : कोठें आहेसं तूं ?
वसंता : आई! आतां मी अदृश्य झालों आहे. मला जाऊं दे. वार्यावर बसून मी जात आहें.. गेलों-गेलों-गेलों !
वेदपुरुष : वसंता! सभेची वेळ केव्हांच झाली.
वसंता : ही कांहीं गांधींची सभा नाहीं. ही सनातनींची सभा आहे. दिक्कालातीतांची सभा आहे. सहा म्हणजे सात होतील.
वेदपुरुष : सारें टिळकउद्यान भरलें आहे.