सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 32

''मी जाणार नाही. या लाल झेंड्याखालीं त्या दिवशीं सभा झाली. सभेला आलेल्या मजुरांना शेटजींचे मॅनेजर काढणार आहेत. सर्व जगभर जो दिवस साजरा केला जातो, त्याचा का तुम्हीं अपमान करावा ? काय केलें होतें मजुरांनी ? त्यांनी त्या दिवशीं जगांतील त्यागाचे इतिहास ऐकले. दुसरें कोणतें पाप त्यांनी केलें ? त्या मजुरांना काढणार नाहीं अशी मला येथें हमी द्या. उद्यां तुम्ही जाल थंड हवा खायला व येथें या मजुरांना उपाशीं मरावें लागेल. बोला.''

'' या सभेला तुम्ही कां आलेत ?'' शेटजींनीं विचारलें.

''तुमची अन्यत्र गांठ पडत नाहीं म्हणून !'' ते गृहस्थ म्हणाले.

''ही गंभीर सभा आहे !'' शेटजीं म्हणाले.

''मजुरांच्या मुलाबाळांच्या जीवनाचा प्रश्न आम्हांला या दगडी सोन्यामारुतीपुढच्या घंटेपेक्षां अधिक गंभीर वाटतो !'' ते मजूर पुढारी म्हणाले,

''त्याला ओढारे, चावट मनुष्य !'' कोणीतरी ओरडलें.

''खबरदार ओढाल तर. मारुति लंकादहान करतो, हें विसरूं नका. मारुतीला पकडू त्याच्या शेपटीला आग लावाल, परंतु तुम्हीच पस्तावाल. कोट्यावधि दडपलेले सोन्यामारुति जागे होत आहेत. राम त्यांच्याकडे येत आहेत. सावध रहा, मी घंटा वाजवतों, सावध रहा.''

ते पहा पोलीस आले. लाल झेंडा हिसकावून घेण्यांत आला. पोलिसांनीं त्या व्यासपीठावर चढलेल्यास गिरफदार केलें. तेथें दुसरा उभा राहिला. सभेंत महात्मा गांधीकी जय सुरू झाला. ते पहा शेंकडों मजूर आलें. स्वयंसेवक थंड झाले. या रामाच्या सेनेपुढें आपलें काय चालणार! गांधींच्या लोकांना आपण तडाखे देऊं. परंतु ह्या वानरांना कोण अडविणार ? पोलिसांची लाठी सुरू झाली. शेटजी पळून गेले. विष्णुशर्मा यांची पगडी पडली. शेंकडों मजूर लाल झेंडा फडकवीत गाणीं म्हणत गेले! रामाचे वानर, कष्टाळू वानर माराला न जुमानतां झेंडा फडकवीत गेले.

वसंता : शेटजी संतापले होते.

वेदपुरुष : त्यांनींच पोलिसांना बोलावलें.

वसंता : उद्यां पुष्कळ मजुरांना हांकलून देतील.

वेदपुरुष : मजूर बलवान् होईपर्यंत हें चालणारच. वानरांना राम भेटेपर्यंत रावण त्यांना चिरडणार.

वसंता : यांना राम कधीं भेटेल ?

वेदपुरुष : तुझ्यासारखे तरुण त्यांच्यात गेले पाहिजेत. संघटना करणारे, विचार देणारे, त्यागी व निर्भय असे तरुण त्यांच्यांत शिरले पाहिजेत. म्हणजे या वानरांतूनच हनुमंत निर्माण होतील.  नल, नील, अंगद निर्माण होतील. बहुजनसमाजांतून पुढारी निर्माण होतील. सोन्यामारुति बुभु:कार करितील. या मजुरांतील दिव्यता पहा. तिची वाढ करा. या मजुरांच्या भोंवतालची सारी प्राणघेणी घाण दूर करा. म्हणजे हे मजूर, हे वानर, हे तिरस्कृत पददलित लोक देवाप्रमाणें शोभतील. ते पृथ्वीवर नंदनवन निर्माण करतील !