सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 35

वसंता : तो हरिजनांनीं केला होता, होय ना ?

वेदपुरुष : आपल्या अहंकारी भावांच्या विरुध्द नम्र हरिजनांचा तो सत्याग्रह होता. पुण्याचा सत्याग्रह अहंकारी परकीय सत्तेविरुध्द आहे. आपल्याच भावांना देवाच्या दर्शनासाठीं जे सत्याग्रह करावयास लावतात, त्यांना परकीय सरकारसमोर सत्याग्रह करावयाचा काय अधिकार आहे ? परंतु विचार अहंकारापुढें टिकत नाहीं.

वसंता : नाशिकचा सत्याग्रह रामाच्या रथाला ओढण्याबद्दल होता.

वेदपुरुष : होय. ज्या रामानें वानरांना मिठ्या मारल्या, कोळ्याला कुरवाळलें, भिल्लिणीस पोटाशीं धरलें, पक्ष्यांची श्राध्दे केंली, त्या रामाच्या रथाला आपले हात लागावे असें हरिजनांस वाटत होंतें. जगन्नाथाचा रथ सर्वांनी ओढावा. परंतु सनातनींनीं हरिजनांना लाथाडलें. रथाला त्यांनी हात लावूं दिला नाही.

वसंता : हरिजनांनी मारामारी केली का ?

वेदपुरुष : नाही. शांतपणे सत्याग्रह केला. लहान लहान मुलेंहि सत्याग्रहांत सामील झाली. स्त्रिया तर सर्वांच्या पुढें होत्या.

वसंता : पुण्याच्या सोन्यामारुति सत्याग्रहांत किती स्त्रिया गेल्या ?

वेदपुरुष : त्यांची गणति व्हावयाची आहे. हळदीकुंकवे संपली म्हणजे स्त्रिया पदर बांधून पुढें सरसावतील, परंतु त्यांना पकडणारच नाहींत.

वसंता : नाशिकला पोलिसांची म्हणे कडेकोट तयारी होती ?

वेदपुरुष : हो रामाच्या रथाबरोबर शेकडों पोलीस होते. जंणू पोलिसांचीच मिरवणूक कोणा सरकारी लाटसाहेबांचीच मिरवणूक !

वसंता : ती का रामाची मिरवणूक म्हणायची ? तो रामाच्या रथाचा सोहळा नसून ती रामरायाची तिरडी होती. तुम्हांला नाहीं असें वाटत ?

वेदपुरुष : अगदी बरोबर. रामाला यांनी मारून टाकलें आहे.  हरिजनांना दूर करतांच राम मरतो. रामाजवळून वानर दूर केलेत तर तें रामाला कसें खपेल ? आणि रामांचे जीवनकार्य काय, त्याचीहि या वेदजड मूढांना आठवण राहिली नाही. जगाचा जाचकाच दूर करणारा राम! जगांत गुलामगिरी पसरवणार्‍या सम्राटांचा चक्काचूर करणारा राम! चौदा चौकड्यांच्या रावणाला धुळींत मिळवणारा राम! त्या रामरायाच्या रथाची मिरवणूक नाशिक क्षेत्रांत पोलिसांच्या दंडुक्याच्या साहाय्यानें काढण्यात यावी! शिवशिव! याहून अध:पात तो कोणता ? रामरांयाच्या अंगाची लाहीलाही झाली असेल. ज्या तिरस्कृत  व पददलित लोंकाना घेऊन त्यांना हुरूप व उत्साह देऊन, रामानें मदोध्दतांचा मद उतरविला, त्यांनाच हे रामोपासक आज रामाच्या रथाला हात लावूं देत नाहींत! केवढी कृतघ्नता! केवढी विचारहीनता !