वेदपुरुष : त्या अश्रूंतील अनन्त भाषा त्या ओट्यावर बसलेल्या पांढरपेशांस काय समजणार ? त्या मोत्यासारख्या अश्रूंना, मोत्यांची भिकबाळी कानांत घातलेल्या जमीनदाराकडे बघत ते हंसत आहेत. अश्रूंची जगांत टर व्हावी ना ?
वसंता : हे अश्रूं फुकट का जातील ?
वेदपुरुष : पाण्यांतून वीज निर्माण होते. डोळ्यांतील पाण्यांतून फारच झपाट्यानें महान् विद्युच्छक्ति निर्माण होत असते.
वसंता : ती शक्ति जगाचा संहार करील.
वेदपुरुष : जग खर्या धर्माचें उपासक जर न होईल, तर जगाचें या विद्युच्छक्तीनें भस्म होईल.
वसंता : कांहीं बोलाचाली सुरू झाली. ऐकूं या.
धोंडभट : काय विठये! कशाला आलीस ?
केशव पाटील : आली भीक मागायला.
हरिपंत : नवर्याबरोबर तुरूंगांत जावें कीं नाहीं ?
विठी : या तान्ह्या पोराला घेऊन कोठें जायचें दांदानो ?
धोंडभट : म्हणजे तुझ्याहि मनांत जायचें होतें ना ?
विठी : ते गेले मग आपण का मागे रहायचें ?
जमिनदार : रामसीतेचाच जणूं तुमचा जोडा !
हरिपंत : तुरुंगात खायला मिळालें असतें, पोटभर पाणी मिळालें असतें, पोराला दूध मिळालें असतें, विठ्ये! वेडी तूं, उगीच राहिलीस.
केशव पाटील : जा, नीघ येथून तुम्ही माजलीं आहांत सारीं. आमच्या हातांत तुमच्या नाड्या आहेत. लागलीं नाचायला वानरें! किती दिवस अन्नापाण्यावाचुंन राहतां तें तर दिसूं दे.