सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 39

जमीनदार : रामाच्या रथाला ओढू पाहण्याचे.

विठी : तें पाप मी जन्मोजन्मीं करीन.

धोंडोपंत : जन्मोजन्मी अन्नपाण्यावांचून तडफडशील.

विठी : उगी, उगी. किती रडशील राजा ? लेंकराकडे पहा हो.

केशव पाटील : येथून चालती हो. नाहींतर म्हण, की आम्ही चुकलों. म्हण, माझा नवरा चुकला. असें पाप पुन: करणार नाहीं.  म्हण, आहे तयारी ?

विठी : असें कसें म्हणूं ? पुण्याला पाप कोणत्या तोंडानें म्हणूं ? जीभ कशी दादांनो वाटवूं ?

हरिपंत : तर मग जा. एक शब्द अधिक बोलूं नकोस.

विठी : जात्यें दादांनों! कळवळलें पोर. काय देऊं तुला बाळा ? हें डोळ्यांतील पाणी पाजूं ? उगी उगी.

वसंता : कोठें जाणार ती.

वेदपुरूष : मरणाकडे.

वसंता : आपणांला नाहीं का काही करता येणार ?

वेदपुरूष : काय करशील ? आकाशाला ठिगळ कोठवर जोडशील ? ही सारी समाजरचना बदलली पाहिजे. खोट्या धर्माचा नायनाट झाला पाहिजे. माणुसकीची महती सर्वांनी कळली पाहिजे.

वसंता : परंतु ती केव्हां कळणार ? किती निष्ठुर आहेत हे लोक ?

वेदपुरूष : ही त्यांची धर्मनिष्ठा आहे. याला ते रामाची भक्ति म्हणतात. दगडी रामाची भक्ति! जिवंत देवांना भारतात आणि दगडी देवांना नाचवतात!

वसंता : दगडी देवांसमोर आरास करतात, निंबलोणें उतरतात. तेथें पेढे वांटतात, साखर वांटतात, भोजनें चालतात.

वेदपुरूष : परंतु या देवांच्या घरीं काय आहे ? रात्रीं चांदण्यांचा व चंद्राचा प्रकाश झोंपडीत येईल तेवढाच. काय कोरडी भाकर कधीं मिळेल तेवढीच. या लाखों देवांच्या घरांत मंगल दिवे असावेत, नैवेद्य असावेत, असें कोणाला वाटत आहे ?