वसंता : आमचे लोक दगडाधोंड्यांत देव मानतात ; झाडामाडांत देव पाहतात ; नदी पाहून दिडकी टाकतात. परंतु मानवांतील देव त्यांना कां दिसत नाहीं ? मानवांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या करूणगंगा पाहून त्यांचे हात कां जोडले जात नाहींत?
वेदपुरूष : विचारशून्य आहेत म्हणून. ते चैतन्याला चिरडतात व जडाची पूजा करतात. तुमचे लोक पाश्चिमात्यांना जडवादी म्हणतात. परंतु अधिक जडवादी तुम्ही आहांत. तुम्हांला न बोलणारा, न रडणारा दगड प्रिय वाटतो. परंतु चिन्मय मनुष्य मातीमोल वाटतो!
वसंता : किती सुंदर विचार तुम्ही सांगितलांत! खरेंच. आम्हीच जडवादी आहोंत, जडपूजक आहोंत. चैतन्याची पूजा केव्हां सुरू होईल ?
वेदपुरूष : तुझ्यासारखें तरूण उठतील तेव्हां. तुम्ही मानव्याचा दीप पाजळा. चैतन्याची पूजा करा. या तेहतीस कोटीच नाहीं, शेंदोनशें कोटी मानवांची पूजा करावयास उठा.
वसंता : आपण या महारवाड्यांत जाऊं. विठींचे काम पाहूं.
वेदपुरूष : चल, सोन्यामारूति पहायला चल. सोन्यासारखीं माणसें कर्श धुळींत मिळवलीं जात आहेत तें पहा. आणि शेंकडों जिभांनीं तें जगाल गर्जूंन सांग.
वसंता : काय हीं घरें ? पावसांत हीं कशीं टिकत असतील ?
वेदपुरूष : तूं वडार लोक पाहिले आहेस ? पावसांत त्यांचीं घरें पाण्यावर तरंगूं लागतात! अरे, गरिबांना पावसांत झोंप नसते. आधार नसतो.
वसंता : सर्वत्र सामसूम आहे अगदीं. नाहीं म्हणायला दोन कुत्री भुंकत आहेत.
वेदपुरूष : तीं कुत्री रडत आहेत. त्यांच्या आवाजांत करूणा आहे. जगांत सहानभूति नाहीं असें देवाला तीं सांगत आहेत.
वसंता : हें कुत्रें कोठून आलें ? त्याच्या तोंडांत भाकर आहे.