सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 41

वेदपुरूष : देवाचें काव्य बघ.

''पश्य देवस्य काव्यं
न ममार न जीर्याति''

वसंता : कोठें चाललें हें ?

वेदपुरूष : तीं दुसरीं कुत्रीं धांवून आली! त्या कुत्र्याची भाकर पळविणार का ? बळी तो कान पिळी. मानवाचा कायदा पशूंनीं उचलला पाहिजें श्रेष्ठाप्रमाणें खालच्या योनि वागणार. श्रेष्ठाचें अनुकरण करणार.

वसंता : त्या कुत्र्याने भाकर खालीं ठेवली. त्या दोन कुत्र्यांना तो कांहींतरी सांगत आहे.

वेदपुरूष : तीं दोन कुत्रीं गेलीं. कोठें चाललीं तीं ?

वसंता भाकरीचे तुकडे घेण्यासाठी चाललीं असतील!

वेदपुरूष : हें कुत्रें कोठें चाललें ? पुन्हा तो तुकडा तोंडांत धरून कोठे चाललें ?

वसंता : ते त्या झोंपडीजवळ जात आहे. आंत शिरलें. हें काय ? तुकडा खालीं टाकून तें रडूं लागलें. आंत जात आहे, बाहेर येत आहे. त्याचें काय हरवलें ?

वेदपुरूष : पुन्हा तुकडा उचलून निघालें. वार्‍या प्रमाणें निघालें.

वसंता : आपणहि त्याच्या पाठोपाठ जाऊं.

वेदपुरूष : त्या नदीतीरावर त्या झाडाच्या सावलींत कोण पडलें आहे ?

वसंता : कोठें बरें ?

वेदपुरूष : त्या बाजूला.

वसंता : ती विठी आहे. पोटाशीं बाळ आहे. मायलेंकरें झोंपीं गेली आहेत.

वेदपुरूष : क्षणाची झोंप कां चिरकालची झोंप ?

वसंता : हरि जाणे.

वेदपुरूष : आलें, कुत्रें आलें. तुकडा खाली ठेवून विठीचें फाटकें लुगडें तें ओढीत आहे. विठीला कशाला उठवतोस बाबा ?