वेदपुरूष : हिंदुधर्म हा ज्ञानाला प्राधान्य देणारा आहे. विचाराला प्राधान्य देणारा आहे. परंतु विचाराचाच डोळा आज आंधळा झाला आहे. कसें तरी वागतात, कांहींतरी करितात. तुम्हीं तरुणांनी पुन्हा गायत्री मंत्राची उपासना सुरू करा. हातांत जानवीं घेऊन नको करायला. गायत्रीचा जप म्हणजे बुध्दि तेजस्वी तरतरीत ठेवणें. बाबावाक्यं प्रमाणं न मानणें. ही विचाराची दृष्टि आली म्हणजे खरा धर्म येईल. खरा धर्म आला कीं खरा सदाचार सुरू होईल. खरा सदाचार आला कीं समाजांतील अन्याय दूर होतील. समाजांत सुख व सास्थ्य यांचा सुकाळ होईल.
वसंता : आज आपण कोठें जावयाचें ?
वेदपुरूष : चल माझ्याबरोबर. आज तुला भयंकर ठिकाणीं नेणार आहें.
वसंता : तेथे काय दिसेल ?
वेदपुरूष : तेथे दु:ख दिसेल. निराशा दिसेल. माणुसकीशिवाय बाकी सारें दिसेल.
वसंता : हे कसले ठोके पडत आहेत ?
वेदपुरूष : त्या भीषण इमारतींत किती वाजल्याचे ते टोल आहेत.
वसंता : केवढा दरवाजा! आणि हे किती पहारेकरी!
वेदपुरूष : हा सबंध दरवाजा क्वचितच उघडण्यांत येत असतो. ती लहानशी दिंडी. तिच्यांतून जावयाचें.
वसंता : आपण सूक्ष्मरूपें धारण केल्यामुळें आपणांस कोठेंचे प्रत्यवाय नाहीं. या इमारतीचें काय नांव ? हा किल्ला आहे ?
वेदपुरूष : याला तुरूंग म्हणतात.
वसंता : अरे बाप रे! फांशी देतात येथें ?