सुभेदार : नीट उभा रहा. सरळ बघ.
सुपरिंटेंडेंट : काय केलें यानें ?
सुभेदार : चक्कीची वर्दी पुरी करीत नाहीं.
जेलर : तूं दुसर्यांदा येथें आला आहेस. काम पुरें केलें पाहिजे.
वाल्या : माझ्या बोटांना फोड आले आहेत.
जेलर : डॉक्टर काय म्हणाले ?
वाल्या : काम होईल ते म्हणाले.
सुपरिंटेंडेंट : तर केलें पाहिजे.
वाल्या : पहा साहेब बोटें !
जेलर : डॉक्टर सांगेल तें खरें. जाव. पुन्हा तक्रार आली तर फटक्यांची सजा होईल.
सुपरिंटेंडेंट : दौलत !
सुभेदार : उभा रहा रे नीट.
जेलर : काल फत्तारगाडीवर होता. पळून जाऊं पाहात होता.
सुपरिंटेंडेंट : गंभीर गुन्हा आहे.
दौलत : साहेब, हें साफ खोटें आहे. उन्हामुळें मला झांब आली. आमच्या पायांत कांहीं नाहीं. तीन मैलांवरुन सकाळपासून दोन खेपा आम्ही आलों. मला तिरिमिरि आली, म्हणून मी झाडाखालीं बसलों, साहेब. पळून कसा जाऊं ?