शिपाई : हा लबाड आहे. माझें लक्ष नसतें तर तो गेला असता.
सुपरिंटेंडेंट : दंडाबिडी, अंधारी.
जेलर : या शिपायाला बक्षीस दिलें पाहिजे.
सुपरिंटेंडेंट : पांच रुपये द्या. नीट लक्ष ठेव रे.
वसंता : वेदपुरुषा! चल, अन्यत्र जाऊं.
वेदपुरुष : हा इकडे दवाखाना आहे.
वसंता : चांगला आहे का ?
वेदपुरुष : डॉक्टराला पगार असतो, तितक्याचीं औषधेंहि येथें वर्षाला नसतात! सारा देखावा आहे. सर्वांच्या रोगावर साधारण रामबाण असें एकच पेय असतें. एकाचें औषध चुकीनें दुसर्याला गेलें तरी फारसें बिघडत नाही.
वसंता : हें काय प्रकरण चाललें आहे ?
सुभेदार : कोठून आलें हे चित्र ? बोल, साल्या लाथ मारीन, तुला फोडून काढीन. बोल.
माणक्या : मागें एक सत्याग्रही होता त्याच्याजवळून मीं घेतलें. तें मला आवडलें होतें. मी त्याची रोज पूजा करतों. मीं चोरुन नाहीं घेतलें.
सुभेदार : तुरुंगांत का देवाची पूजा करावयाची ? घरीं जा व कर देवाची पूजा. तुरुंगांत चक्की व दंडाबिडी. समजलास ?
शिपाई : फाडून टाकूं हें चित्र ?
सुभेदार : फाडून टाक.