सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 53

कैदी : नको असें बोलूं, कृष्णा! खरें म्हटलें तर मला छळावयाची सत्ता आज तुझ्या हातांत आहे. सूड तुला उगवतां येईल.

कृष्णा वॉर्डर : धनी! प्रेमानें आतां राहूं. एकमेकांना प्रेम देऊं. चला. भत्ता आला. मी शिटी मारतो.

वसंता : किती थोर आहे याचें मन.

वेदपुरुष : पोरांना खायला देतां येईना म्हणून यानें एकाच्या खळ्यांतून धान्य चोरुन नेलें. याला भिकेला लावणारा सावकार तोहि तुरुंगांत आला आहे! योगायोग !

वसंता : अपकारकर्त्यांवर उपकार करणारा देवासारखा वाटतो! कृष्णाच्या या प्रेममय वागणुकीमुळें सावकार बदलून जाईल !

कृष्णा वॉर्डर
: बसा माझ्या शेजारीं.

कैदी : कर आरंभ.

कृष्णा : तुम्ही माझी पोळी घ्या. तुमची भाकर मी घेतों. तुम्हांला अशा भाकरीची संवय नसेल. घ्या. संकोच नका करुं.

कैदी : कृष्णा !

कृष्णा : मनाला लावून नका घेऊं. संकोच नको. तुमच्या अन्नावर लहानपणीं मी वाढलों आहें. तुमच्या शेतावर पोसलो आहें.

वसंता
: कैद्यांमध्येंहि दिव्यता असते !

वेदपुरुष : अरे हे सारे सोन्यामारुती आहेत. समाजानें यांना चोर बनविलें, लुटारू, खुनी बनविलें! हे सारे श्रम करणारे, कष्ट करणारे लोक. परंतु मरमर काम करूनहि त्यांची उपासमार टळत नाहीं. उघड्या डोळ्यांनी त्यांना बायकापोरांचे हाल पहावत नाहीं. करतात चोरी. येतात तुरुंगांत.

वसंता : या काळ्या टोप्या कांहींना कशासाठीं ?

वेदपुरुष : काळी टोपी म्हणजे निर्ढावलेला चोर. पुन: पुन्हा तुरुंगांत येणारा. एकदां चोर ठरला की तो कायमचाच चोर ठरतो. पोलीस त्याच्यावरच नेहमीं संशय घेतात. लोक त्याला नांवें ठेवितात. शेवटीं तो पुन्हा तुरुंगांत येतो. एकदां तुरुंग म्हणजे मरेतों तुरुंग.

सुभेदार : ए राजाबुढ्या! इकडे ये.

वसंता : सुभेदार इकडे कशाला आले !