वेदपुरुष : दर तीन महिन्यांनी गांवांतील कांही शिष्टांची व अधिकार्यांची कमिटी येत असते. तुरुंगाची पाहणी करायला येत असते ती कमिटी. परंतु ते सारे दगडच असतात. त्यांना नसतें हृदय. नसते प्रतिभ. कोणी डोळ्यांत पाणी आणून तक्रार केली तर ते शिष्ट हंसतात! आणि तक्रार करणार्यांवर जेलर सुभेदार दांत ठेवतात. सारा फार्स असतो. दर रविवारीं उपदेश करावयालासुध्दां कोणी पंडित येतो. चोरी करूं नका, दारू पिऊं नका, असा तो उपदेश करतो. परंतु चोर चोरी कां करतो, दारू पिणारा दारू कां पितो, याचा विचार त्या उपदेशकाच्या मठ्ठ डोक्यांत येईल तर हराम! पंधरा मिनिटें उपदेश करतो, पांच दहा रुपये घेऊन जातो! चोर नाहीं तर! पंधरा मिनिटांच्या पोपटपंचीचे असे रुपये घेणारा चोर, का दहा तास काम करूनहि तीन आणे मिळत नाहींत म्हणून क्वचित् चार कणसें तोडणारा तो चोर ? कोण चोर ? बैल आहेत सारे.
वसंता : रशियांतील तुरुंगांत वाचनालयें आहेत, क्रीडांगणें आहेत, समारंभ आहेत, गंमत आहे. माणुसकी निर्माण करणारीं तीं साधने आहेत. तुरुंगांत खेळांच्या शर्यती लावतात. तुरुंगांतील कैद्यांनी निर्माण केलेलीं फुलें त्यांना तोडतां येतात. आपल्या खोल्या ते सजवतात. फळे, भाज्या स्वत: निर्माण करावें, घ्यावें, सर्वांनी खावें. तेथें प्रेम, उद्योग, स्वाभिमान, ऐक्य, माणुसकी, यांनीं ते संपन्न होतात. वानरांचे देव होतात. परंतु आपणांकडे काय आहे ?
वेदपुरुष : जें बाहेर आहे तेंच आंत असते. तुरुंग म्हणजे बाहेरच्या समाजाचें प्रतिबिंब असतें. महार, मांग, भिल्ल यांना तुरुंगांत भंग्याचें काम देण्यांत येतें. त्यांना अलग राखण्यांत येतें. बाहेरचे भेद आंतहि आहेत. तुमचा समाज लब्धप्रतिष्ठित आहे म्हणूनच दास्य आलें आहे.
वसंता : मागें सत्याग्रहांत आम्ही गेलों. परंतु खरा तुरुंग आम्हांला पहावयास मिळाला नाहीं. आम्ही वरळीला होतों तेथें तर गंमत होती.
वेदपुरुष : चल आतां जाऊं. हे तुरुंगदर्शन पुरें. पुढें तुमच्यासाठीं विराट् कर्म वाढून ठेवलेलें आहे तें पहा. कळया कुसकरल्या जात आहेत. जीवनें भ्रष्ट होत आहेत. या तुरुंगातील सारे कैदी कोणत्याही शिष्टाइतकेच पवित्र व थोर आहेत. शिष्टाहूनहि पवित्र आहेत. कारण स्वत: श्रमून हे खातात. परंतु हे पतित मानिले जातात. सारे यांच्याकडे पाहून नाकें मुरडतात! या पतितांना पावन म्हणणारा पतितपावन राम केव्हां बरें यांना भेटेल ?
वसंता : पतितांना पावन समजतो, पतितांतील दिव्यता पाहतो, तोच खरा पतितपावन! पतितांना पावन करणारा तो पतितपावन असा समास सोडविण्यांत येतो. परंतु तुम्हीं केलेला विग्रह अभिजात आहे. समाजाकडून पतित मानल्या जाणार्या जीवांना जो पावन समजून हृदयार्शी धरतो, तो पतितपावन! वानरांना आलिंगन देणार्या प्रभु रामचंद्रालाच हें विशेषण साजून दिसतें.
वेदपुरुष : साम्यवादी महात्मे तेंच करीत आहेत. ते सारे पतितपावन राम आहेत. भारतांतहि असें पतितपावन सीताराम दिसूं लागले आहेत! सोन्यामारुतींना भेटायला ते निघत आहेत. चला, आपण बाहेर पडूं.