वसंता : तो पलीकडे झाडींत गांवच आहे. आपण या शेतांतून जाऊं या.
वेदपुरुष : अरे, त्या गाईच्या पाठीवर कोण आहे ?
वसंता : कसा ऐटींत बसला आहे! आणि हातांत तिरंगी झेंडा! कोणीं दिला त्याला झेंडा ?
वेदपुरुष : मुंज लावणारा कोणी या गांवांत येऊन गेला असेल !
वसंता : या निवडणुकीच्या वेळेस प्रचार खूप झाला. तीस साल पुन्हा आलें होतें. फेर्या, गाणीं, मिरवणुकी, झेंडे-खूप स्फूर्ति संचरली होती.
वेदपुरुष : काय रे मुला! हा झेंडा कोणीं दिला ?
मुलगा : मागें एक गांधी आला होता, त्यानें दिला.
वसंता : तुला गाणीं येतात का ?
मुलगा : पण आम्ही गांवांत म्हणत नाहीं. पाटील बोंबलतो.
वसंता : मग कोठें म्हणतां ?
मुलगा : येथें माळावर. आम्ही झाडावर झेंडा लावतों व गाणी म्हणत नाचतों. तुमच्याजवळ झेंडा नाहीं तो! तुम्ही गांधी आहांत ? कीर्तन करणार का गांवांत ?
वसंता : व्याख्यानाला लोक येतात का ?
मुलगा : लोक जमतात.
वसंता : पाटील रागावत नाहीं का ?
मुलगा : पाटील तणतण करतो. परंतु लोक सभेला जमतात. आमच्या गांवांत गांधीलाच मतें दिलीं. तुम्हांला पोवाडे येतात का !
वसंता : हो.
मुलगा : आज रात्री म्हणा.