सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 70

वसंता : तुझा झेंडा मजजवळ दे. मी खांद्यावर घेऊन गावात जातो. म्हणजे माझ्याभोंवतीं मुलें जमतील. परत जातांना मी तुला देईन.

मुलगा : हा घ्या. परंतु परत द्या हो.

वसंता : गांधींचे लोक फसवतील का ?

मुलगा : नाहीं.

वसंत व वेदपुरुष गांवाजवळ आलें. गांवांत गर्दी होती. गाई, गुरें परत येत होतीं. शेतांतून लोक परत येत होते. गांव गजबजला होता. वसंताने खांद्यावर झेंडा घेतला होता.

''गांधी आला, गांधी आला'' मुलें म्हणूं लागली. वसंताच्या भोंवतीं मुलें जमली. रामाभोंवती वानर जमले. ध्येयाभोंवतीं भक्त आले.

मुलें
: तुम्ही गाणें सांगा, आम्ही म्हणतों.

वसंता : आधीं नीट रांगेंत उभे रहा.

एक मुलगा : दोघे दोघे व्हा रे. त्रिंबक, नीट रहा उभा.

वेदपुरुष : पुढारी आपोआप उमटून दिसतो. नायक आपोआप पुढें येतो.

वसंता : म्हणा.

शेतकरी कामकरी
सत्ता घ्यावी स्वीय करीं ॥ शेतकरी ॥

शेतामध्यें दाणे पिकवी
सोन्याऐशीं शेंतें हंसवीं
परी रिकामी त्याची पिशवी
अन्यायाला दूर करी ॥ सत्ता घ्यावी ॥

जुलूम सगळा जाळुन टाकूं
लढावयाला सारे ठाकूं
कार्यक्रम या आपुला आंखूं
चढून जाऊं चला वरी ॥ सत्ता घ्यावी ॥

पोटभरी ती भाकर मिळवूं
ज्ञानाचाही प्रकाश घेऊं
तनामनानें मोठे होऊं.
गुढीपाडवा घरोघरीं ॥ सत्ता घ्यावी ॥

पाटील : मिरवणूक नाहीं गांवांत काढायची.

वसंता
: कोण म्हणतें ?