सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 71

पाटील : मी म्हणतों.

वसंता : तुम्ही कोण ?

पाटील : मी गांवचा राजा आहें.

वसंता : ते दिवस आतां गेले. हीं सारीं मुलें म्हणजे राजा.

मुले : आम्ही राजे. आम्ही राजे. म्हणा रे गाणें.

पाटील : मी रिपोर्ट करीन.

वसंता
: मीच नीट तुम्हांला लिहून देईन.

पाटील : अहो ते पोलीस आम्हांला त्रास देतात.

वसंता : त्यांना सांगा कीं गांधीचे लोक शहरांतच कां नाहीं पकडीत ? इकडे येऊंच कां देतां ? ज्या अर्थी पोलीस सध्यां आम्हांस पकडीत नाहीं, त्या अर्थी सध्यां तरी हें सारें कायदेशीर आहे. नाहीं का ?

पाटील : बरोबर. आम्हांला हें सारें समजत नाहीं. आम्ही उगीच भितों.

वसंता
: शहरांतून म्युनिसिपालिटीनें झेंडे लावले आहेत. त्यांना लावतां येतात, मग आपणांस कां लावतां येत नाहींत ?

पाटील
: बरोबर.

मुले
: आपल्या ग्रामपंचायतीवर आपण झेंडा लावूं.

वसंता : काय हरकत आहे ?

पाटील : अहो, ते आमच्यावर मग दांत ठेवतात. नाना खटले भरतात, गांवांतहि भांडणे असतात. कलागती होतात !

वसंता : परंतु किती दिवस भ्यायचें ? या पोरांना तरी भिववूं नका. पोरांनीं केलें म्हणून सांगावें.

मुलें : आम्ही आला फौजदार तर त्याला सांगूं आम्हीं झेंडा लावला. आमच झेंडा. ''झेंडा उंचा रहे हमारा.''

वसंता : मी चावडींतच उतरतों. कोठें आहे चावडी ?

मुलें : त्या बाजूला.

एक शेतकरी
: फौजदारांचा टांगा आला. पाटील, टांगा आला.

पाटील : खरें कीं काय ?

शेतकरी : हो.

पाटील : हें पाहा पोरांनो, मिरवणूक थांबवा. तुम्हीहि चावडींत नका जाऊं.