सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 83

चालक : आपल्या शाळेंत तें येतें ?

शिक्षक : नाहीं. मी तें धरून आणलें होतें.

चालक : जें वर्तमानपत्र शाळेला पसंत नाहीं, तें वर्गांत आणून वाचणें गुन्हा नाहीं ?

शिक्षक : निषिध्द पत्रांची, पुस्ताकांची, मासिकांची यादी शाळेंत लावलेली नाहीं.

चालक : तुम्ही बोलण्यांत मगरूरपणा दाखवीत आहांत.

शिक्षक : आपणांस दिसत असेल तर मी दिलगीर आहें.

चालक : तुम्ही वर्गांत मुलांना अनेक भाकडकथा शिकवीत असतां. मुख्य विषयाकडे तुमचें लक्ष नसतें. तुमच्या विषयांत मुलें नापास झालीं तर संस्थेवर ठपका येईल !

शिक्षक : नापास झालीं तर मला काढून टाका.

चालक : तुमच्या वर्गात एक मामलेदारांचा मुलगा आहे.

शिक्षक : मग ?

चालक : तो घरीं सांगेल कीं आमच्या वर्गांतले इतिहास-शिक्षक काँग्रेसची माहिती देतात. हरताळासंबंधीं वाचून दाखवितात. मामलेदार रिपोर्ट करतील. शाळेला धोका पोचेल. ग्रॅट कमी होईल. संस्थेचें नुकसान होईल. तुम्हांला असें का वाटतें कीं आम्हांला देशभक्ति नाहीं ? परंतु प्रत्यक्ष व्यवहार पाहून सार्‍या भावना मारून टाकाव्या लागतात.

शिक्षक : प्रत्यक्षापेक्षां काल्पानिक भीतिच तुम्हांला फार! कॉग्रेस शब्द सुध्दां का संस्थेंत उच्चारिला जाऊं नये ?

चालक : अहो, जपावें तेव्हढें थोडेंच. सायंकाळच्या बहिष्काराच्या सभेला तुम्ही गेले होतेत ?

शिक्षक : होय.

चालक : तुम्ही फैजपूर काँग्रेसलाहि गेले होतेत ?

शिक्षक : सारी दुनिया गेली होती.

चालक : हाच तो उध्दटपणा. अशानें तुम्हांला कमी करावें लागेल.