सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 85

शिक्षक : आजपासून वर्गात कांही एक इतर वाचायचें नाहीं. आक्लंड व फाक्लंड याशिवाय कांही बोलावयाचे नाही.

मुलें : तुम्ही आम्हांला वाचून दाखवीत जा, माहिती सांगत जा.

शिक्षक : ह्या भव्य संस्थेंत तें शक्य नाहीं. ह्या भव्य संस्थेच्या पायांत भीति पुरलेली आहे. भीतीवर उभारलेली ही इमारत आहे. हे दगड,  ह्या भिंती-- ह्यांत सर्वत्र भीति आहे. ही शाळा नाही. हा तुरुंग आहे. येथें हुकमाप्रमाणें वागलें पाहिजें. आपल्या प्राचीन शिक्षणसंस्थांमध्यें राजासुध्दां मोठ्या आदरानें जाई. ''विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि आश्रमपदानि नाम'' आश्रमांत विनयानें प्रवेश केला पाहिजे असें दुष्यंत म्हणे. परंतु आज एखाद्या साध्या फाटक्या सरकारच्या नोकरानें यावें व संस्थेत येऊन ऐटीने सांगावे कीं शाळेंत असें धोरण पाहिजे! मुलांनो! खरें शिक्षण तुम्हांला या भिंतींच्या बाहेर मिळेल. सभांना जा, वाचनालयांत जा, मिरवणुकींत जा. शाळेंत फक्त लिहावाचायला शिका.

वसंता : किती करुण आहे दृश्य !

वेदपुरुष : परंतु यांची चीड कोणाला येंते ? आपल्या मुलांची मने मारलीं जात आहेत, आत्मे दाबले जात आहेत, इकडे कोणाचें आहे लक्ष ? सोन्यामारुतीपुढची घंटा सर्वाना महत्वाची वाटत आहे, परंतु मुलांची हृदयें प्रचंड घंटा वाजवीत आहेत तिकडे किती पालकांचे लक्ष आहे ?

वसंता : तीं तिकडे लांब मुलें उभीं आहेत तीं म्युनिसिपालिटीच्या शाळेंतील दिसतात. तीं कोणाभोवतीं जमलीं आहेत ?

वेदपुरुष : तुम्ही मास्तर आतां परत नाही येणार ?

मुलें : तुम्हीच आम्हांला आवडतां. तुम्ही कोणाला मारलें नाहीं. छानछान गोष्टी सांगितल्यात.

एकजण : त्या दिवशीं ती गरीब मुलाची गोष्ट ऐकताच मला रडूं आलें.

मास्तर : तुमचे पूर्वीचे शिक्षक परत आले. त्यांची रजा संपली. दोन महिन्यांपुरतीच तुमची आमची ओळख.

मुलें : सिंहगडला तुम्हीं नेलेंत, किती मजा !

एक मुलगा : आणि माझे पैसे तुम्ही दिलेत, माझी आई तर रडली तुमचें प्रेम पाहून. तिचें मन भरून आलें.

दुसरा : आंमच्यासाठी तुम्हीं स्वत:च्या पोळ्या भाजून आणल्या होत्यात. मास्तर, तुम्हीच रहा ना ?

मास्तर : तें शक्य नाहीं.

मुलें : तें पहिले मास्तर फार मारतात. वर्गात हूं का चूं करूं देत नाहींत नेहमीं काठी.

एक मुलगा : सोन्यामारुतीपुढच्या सार्जंटासारखी.