सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 90

वसंता : ती लहान मुलें त्या उकिरड्यावर खात आहेत. सडलेले आंबे खात आहेत !

वेदपुरुष : आंबे घरांत सडले तरी चालतील, परंतु ते गरिबांना कोणी देणार नाहीं. स्वत:ला खाववत नाहींत, दुसर्‍याला देववत नाहीं. काय ही संस्कृति!

वसंता : हा कोणाचा वाडा ? कसा भव्य आहे !

वेदपुरुष : एका संस्कृतिसंरक्षकाचा आहे.

सर्वेत्र सुखिन: सन्तु! सर्वे सन्तु निरामया:!!

असें जेवतांना म्हटल्याशिवाय गोड घांस त्यांच्या घशाखालीं उतरत नाही! किती धर्मप्रेम! ते कपाळाभर भस्म लावतात. त्यांच्या गळ्यांत रुद्राक्ष आहेत. कानांमध्यें सोन्यांत मढवलेलीं रुद्राक्षें आहेत. त्यांचा तो भरजरी पीतांबर पाहिलास म्हणजे त्यांची संस्कृति किती किंमतीची आहे तें कळून येईल.

वसंता : हीं मुलें उकिरड्यावर फेंकलेले सडलेले आंबे खात आहेत, हें त्यांना दिसत नाहीं का ?

वेदपुरुष : त्यांची दृष्टि अद्याप शाबूत आहे. कर्मठ पुरुषाची ती सतेज दृष्टि आहे. ते पहा दिवाणखान्यांत महिम्नस्तोत्र म्हणत मधून मधून खिडकींतून ते त्या मुलांकडे पहांत आहेत व मन्दस्मित करीत आहेत.

वसंता : महिम्नस्तोत्र म्हणजे शंकराचें ना ?

वेदपुरुष
: हो, जगाचें कल्याण व्हावें म्हणून हालाहल प्राशन करणार्‍या  शिवाचा महिमा त्या स्तोत्रांत आहे ?

वसंता : आणि त्याचे उपासक सडलेले आंबे गरिबांच्या मुलांच्या तोंडांत जातांना पाहून हंसत आहेत !

वेदपुरुष : यालाच सनातन धर्मकी जय म्हणतात! मुखांत शंकराचा महिमा, पोटांत स्वार्थाचा महिमा! याला म्हणतात संसार व परमार्थ दोन्ही साधणें! याला म्हणतात श्रेष्ठांचा, संस्कृतिसंरक्षकांचा सुंदर व्यवहार !