वसंता : आणि तो पलीकडच्या खाटेवरचा उपडा वळून खोकत आहे.
बरदाशी : पुरे कर रे. खोकूं नको.
वेदपुरुष : हा कोण धांवत येत आहे ?
वसंता : भयंकरच बातमी त्यानें आणिली आहे !
वेदपुरुष : कोणी रोगी मेला. तिकडे असेल ठेवलेला आतां कोठें कळलें. चला आपण पाहूं.
वसंता : परंतु लगेच कळलें कसें नाहीं ?
वेदपुरुष : येथें शेकडों रोगी आहेत. एखादा निजलेला आहे असें वाटतें.
वसंता : परंतु ती शेवटची निद्रा ठरते.
वेदपुरुष : याला कोणी नाहीं का ? अनाथ असावा.
वसंता : याला मठमाती कोण देईल ?
वेदपुरुष : सर्वांची मायबाप म्युनिसिपालिटी.
वसंता : नाहीं तर विद्यार्थ्यांना शारीरशास्त्र शिकण्यासाठीं उपयोग होईल.
वेदपुरुष : मरतांना त्याच्याजवळ कोणी नव्हतें.
वसंता : अरेरे! शेवटचें पाणी कोणीं दिलें असेल ? शेवटचा शब्द कोण बोललें असेल ?
वेदपुरुष : पांखरांनीं गोड शब्द दिले असतील! वार्यानें चौकशी केली असेल !
वसंता : मरतांना आपल्यासाठीं कोणी रडेल का असा विचार मनांत येत असेल नाहीं! मी आजारी पडलों म्हणजे माझ्या समाचाराला कोणी येईल का, माझ्या केंसावरुन, कपाळावरुन, प्रेमानें कोणी हात फिरवील असें मनांत येत असेल. मेल्यावर मृताम्याला पाणी देतात, परंतु शरीरांतून जाऊं पाहणार्या जिवाला डोळ्यांतील दोन थेंबांची तहान असते. दुसरें पाणी त्याला आवडत नाहीं.