सोन्यामारुति

साने गुरुजी लिखित


सोन्यामारुति 103

वेदपुरुष : परंतु अद्याप मारवाडी समाजांत ती बरीच रूढ आहे. त्याची एक गोष्ट तुला सांगतों. एका गांवीं एका मारवाड्याचा मुलगा आजारी पडला. बराच आजारी होता. पलंगावर विव्हळत असे. त्याच्याजवळ त्याचे वडील, चुलते, मोठा भाऊ, आई, आजी-कोणीना कोणी सारखें चोवीस तास असे. श्रीमंत होतें घराणें. त्यामुळें आप्तेष्टहि लांब दूरचे समाचारास येत होते, जात होते, रहात होते. परंतु त्या तरुणाच्या पत्नीस पतीजवळ जातां येत नसें. पतीच्या तोंडांत औषध ओततां येत नसे. पतीची गादी स्वच्छ करतां येत नसे. त्याचे पाय चेपतां येत नसत. त्याच्याजवळ दोन शब्द बोलतां येत नसत. प्रेमानें पहातां येत नसे. कांहींहि प्रेमसेवा ती करुं शकत नव्हती. घरांत औषध तयार करणें तिचें काम. परंतु आजार्‍याच्या खोलींत पाऊल टाकणें शक्य नव्हतें. एके दिवशीं दुपारीं सारी मंडळी जेवावयास गेली. एक लहान दीर आजार्‍याजवळ होता. पत्नीनें ती संधि पाहिली. असा एखादा क्षण यावा म्हणून ती शत नवस करीत होती. मोलाचा क्षण आला. पतीला पाहण्याचा, डोळे भरुन पाहण्याचा, हात हातात घेण्याचा, तो क्षण आला. ती ओथंबलेली मुलगी आंत शिरणार इतक्यांत निषेधाची सूचना खोकण्यानें देत सासरे आले. ती मुलगी चटकन् माघारी गेली. पतीचें दर्शन तिला झालें नाहीं. तिच्या जिवाची व त्याच्या जिवाची केवढी तगमग सारखी होत असेल! एकमेकांना पहावयास, शेवटचें पहावयास तीं दोन हृदयें किती अधीर होत असतील! परंतु घरांतील इतरांना त्याची काय कल्पना ? रूढीखालीं भावना चिरडल्या जात आहेत. रूढींच्या दगडाखालीं जीवनें चिरडलीं जात आहेत !

वसंता : वेदपुरुषा! एकेक गोष्ट सांगतोस व माझ्या जिवाचें पाणी पाणी करतोस.

वेदपुरुष : ह्या सार्‍या सत्यकथा आहेत. सत्यासाठीं प्रसिध्द असलेल्या भरतभूमींतील ह्या सत्यकथा आहेत.

वसंता : ती पहा स्टेशनची मोटार आली. मृताची पत्नी आली.

वेदपुरुष : ती गाय हंबरंडा फोडील !

वसंता : शेवटचें दर्शन घेईन या आशेनें ती आली असेल! या क्षणींच्या तिच्या हृदयांत कोण डोकावूं शकेल ? कोण पाहूं शकेल ? अति पवित्र, गंभीर, गूढ असें तेथें कांहीं तरी असेल.

वेदपुरुष : मोटार गेली.

वसंता : दारांतील सांडलेलें पाणी पाहिलें तिनें. अरेरे! धाडकन् पडली!

वेदपुरुष : ह्या पडण्यांत किती अगतिकता, किती अशरणता, किती दु:ख, किती वेदना असतील ?

वसंता : ह्या पडण्यांत प्रेम आहे कीं अगतिकता आहे ?

वेदपुरुष : अनेक भावनांचें संमिश्रण आहे. प्रेम तर आहेच, परंतु त्यांतहि निराधारपणाची भावना अधिक प्रबळ असेल. पति गेला कीं पत्नीला किंमत नाहीं! माझ्यासाठीं आतां कोण ? माझ्या भावनांना कोण मानील ? माझ्या सुखदु:खची कोण विवंचना करील ? आतां मी म्हणजे माती, मी सुकलेला पाला. जगांतील शिव्याशापांची मी आतां मालकीण. किती तरी भावना व विचार या एक महान् क्षणांत ओतलेले असतील.

वसंता : हे डॉक्टर आले.

वेदपुरुष : डॉक्टर सावध करील, परंतु पुढें काय ? अनंत भविष्य अंधारमयच राहणार !