वेदपुरुष : लोळ लोळ. घोळ घोळ. तुलसीरामायणांत राम जेथें जेथें बसला, उठला, झोंपला, तेथें तेथें भरत लोळून घेत होता असें वर्णन आहे.
वसंता : तुलसीरामायण फारच गोड आहे, होय ना ?
वेदपुरुष : होय! उत्तर हिंदुस्थानचा तो वेद आहे. तूं तें एकदां वाच.
वसंता : मला हिंदीं येत नाहीं.
वेदपुरुष : मग शीक. हिंदीं आलीच पाहिजे. हिंदुस्थानचें हदय एकत्र आणणारी हिंदी आधीं शीक. तुलसीरामायणासाठीं तरी शीक.
वसंता : माझ्या ज्ञानेश्वरीसाठीं माझी मराठी कोण शिकेल ?
वेदपुरुष : तुझी मराठी पॅरिसमधला पंडित शिकेल! ज्ञानेश्वरीच्या व्याकरणांचा अभ्यास पॅरिसमधील विद्यापीठांत होतो.
वसंता : कसा गार वारा आला !
वेदपुरुष : तूं झोंपतोस ना ?
वसंता : हा कसला आवाज ? किती भीषण वाटतो आहे ?
वेदपुरुष : नाशिकमधल्या तुरुंगांतील हा विजेच्या शिंगाचा आवाज !
वसंता : हा थांबत नाहीं.
वेदपुरुष : तुरुंगांत गणति होत आहे. गणति पुरी झाली, कैद्यांची संख्या जुळली कीं तें शिंग थांबेल.
वसंता : असे कां करतात ?
वेदपुरुष : मधून मधून असें करतात. त्यामुळें पहारेकरी, शिपाई नेहमीं सावध राहतात.
वसंता : नाशिकचा तुरुंग प्रसिध्द आहे.