वेदपुरुष : छत्तीस लाख रुपयांचा तेथें फन्ना उडाला आहे.
वसंता : छत्तीस लाखांचा तो तुरुंग आहे ? खरेंच का ?
वेदपुरुष : हो.
वसंता : हे पैसे जर धंदेशिक्षण देण्यांत सरकारनें घातले असते तर किती छान झालें असतें ? गांधींनी पंचवीस लाख रुपये खादी धंद्यांत घातले व पत्रास हजारांना काम दिलें. सरकारलाहि करतां आलें असते.
वेदपुरुष : परंतु माणुसकी हवी, इच्छा हवी. जगांत मांगल्य अधिक निर्माण व्हावें, जास्तींत जास्त लोक सुखी व्हावेत अशी तळमळ हवी. कोण फ्रेंच लेखकानें म्हटलें आहे कीं ''एक शाळा उघडणें म्हणजे एक तुरुंग बंद करणे.'' ती अर्थात बेकारी निर्माण करणारी शाळा असतां कामा नये. देहाच्या पोषणाचीं साधनें देणारी आणि त्याबरोबरच हृदयाचें व बुध्दीचेंहि पोषण कसें करावे तें शिकवणारी ती खरी शळा! देहाची उपासामार बंद न करणारे शिक्षण तें शिक्षणच नव्हे.
वसंता : छत्तीस लाखांची ही मोठी कबरच आहे.
वेदपुरुष : होय. माणसांची जीवनें येथें मातीमोल होतात! हजारों जीवनांची राख होते! कबरस्थान म्हण, कांहींहि म्हण !
वसंता : मी आतां निजतो. गोदामाईच्या मांडीवर निजतों.
वेदपुरुष : नीज नीज. मी काळ्या रामाला प्रदक्षिणा घालतों.
वसंता : वेदांतील कांहीं सुंदर मंत्र म्हणा, उपनिषदांतील भाषा गा. त्यांच्या नादांत मी झोंपेन.
वेदपुरुष : सार्या विश्वांतील वेद ऐकवतों, नीज.
वसंता : क्षणभर मला जगांतील सर्व भाषा समजतील असें करा.
वेदपुरुष : जशी तुझी इच्छा.
वसंता : गा, आतां रशियांतील गीतें गा वा प्रशियांतील गीतें गा. तिबेटांतील गा वा तास्मानियांतील गा. काठेवाडांतील गा. काश्मिरांतील गा.
वेदपुरुष जगांतील महर्षीनीं रचलेलीं महान् रुद्रसूक्तें म्हणूं लागला. नव संदेश देणारीं, नव जीवन देणारीं, खरा पुरुषार्थाचा मार्ग दाखवणारीं पुरुषसूक्तें म्हणूं लागला. जगांत क्रांतीचे नवपवन वाहवणारीं पवमाने पढूं लागला. गरिबांचा गौरव करणारा सौर म्हणूं लागला. जीर्ण शीर्ण झडझडून टाकणारी, सर्वत्र मधुमधु मांगल्य दाखवणारीं त्रिसुपर्णे म्हणूं लागला. अनंत वेद, अनंत ऋचा.
वसंता त्या मंत्रसागरांत बुडून गेला. वेदपुरुष म्हणतां म्हणतां डोलूं लागला, मुका झाला. वेदपुरुषाची ज्ञानमय समाधि लागली.
पहांट झाली! नदीच्या घाटावर सनातनी मंडळी जमूं लागली. पळीपंच पात्रीं वाजूं लागलीं वेदमंत्र कानांवर येऊं लागले. अधमर्षणें सुरु झाली. रात्रीं केलेल्या पापाचें ''रात्रिकृतं पापं नाशयतु'' असें म्हणून भस्म करावयाचें व सायंकाळी ''दिवसकृतं पापं नाशयतु'' असा मंत्र म्हणून दिवसाचें पाप नाहिसें करावयाचें. सोपा मोक्षाचा मार्ग. सदैव पाप करुन सदैव निष्पाप!