गणपतीचे अष्टावतार

आता आम्ही तुम्हाला भगवान गणपतीच्या ८ अवतारांबद्दल माहिती देतो. बाकी देवतांप्रमाणेच गणपतीनेही असुरी किंवा राक्षसी शक्तींचा संहार करायला वेगवेगळे अवतार घेतले. गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये गणपतीच्या या अवतारांचे वर्णन वाचायला मिळते. आता माहिती घेऊ गणापतीच्या ८ अवतारांची. . .


वक्रतुंड

.

वक्रतुंडाचा अवतार मत्सरासुर या राक्षसाच्या संहारासाठी झाला होता. मत्सरासुर हा भगवान शिवाचा भक्त होता आणि त्याने शिवाची उपासना करून असा वर मिळवला होता की त्याला कोणापासूनही भीती राहणार नाही. नंतर त्याने दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या आदेशाने देवताना त्रास देण्यास सुरुवात केली. सुंदरप्रिय आणि विषयप्रिय असे त्याचे २ मुलगे होते. हे दोन मुलगे देखिल अत्यंत अत्याचारी होते. सगळे देव शंकराला शरण आले. शंकराने त्यांना दिलासा दिला की गणपतीला आवाहन करा. गणपती वक्रतुंड अवतार घेऊन मदतीला येईल. देवांनी गणपतीची उपासना केली आणि गणपतीने वक्रतुंड अवतार घेतला. वक्रतुंड अवताराने मत्सरासुराच्या दोनही मुलांचा संहार केला आणि मत्सरासुराला पराजित केले. हाच मत्सरासुर कालांतराने गणपतीचा भक्त झाला.