महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 8

‘जे प्रेम हृदयाला मुक्त करते त्या प्रेमाचा सोळावा हिस्सासुद्धा किंमत सारी सत्कर्मे मिळून होणार नाही. कारण हृदयाला मोक्षसुख देणा-या प्रेमात सारी सत्कर्मे असतातच. प्रेम प्रकाशते, प्रकाश पसरविते, तेज देते.’ ते पुन्हा अन्यत्र म्हणतात, ‘ज्याप्रमाणे माता स्वत:चा जीव धोक्यात घालूनही आपल्या एकुलत्या एक मुलाला जपते, त्याप्रमाणे प्रत्येकाने सर्व मानवांविषयी निस्सीम प्रेम मनात बाळगावे.’ सर्व प्राण्यांविषयी, सर्व सजीव सृष्टीविषयी एक प्रकारचा आदर, एक प्रकारचा पूज्यभाव बुद्धांच्या नीतीत आहे.जो खरा बुद्धधर्मी आहे, तो केवळ गंमत म्हणून प्राण्यांना मारणार नाही, खाण्यासाठी हिंसा करणार नाही. तिर्थक् योनीतील जीवही त्याची जणू भावंडे, पशुपशक्षीही सखे-सोयरे आहेत. आपण मानवप्राणी या इतर सर्व प्राण्यांवर सत्ता चालविण्यासाठी जन्मलो आहोत असे त्याला वाटत नाही. मन शांत व गंभीर ठेवावे, प्राणीमात्रामविषयी प्रेम व सहानुभूती बाळगावी, असे बुद्धांनी अनुशासिले आहे. बुद्ध कधीही पापाविषयी बोलत नाहीत. पाप म्हणजे अज्ञान, मू्र्खता असे ते म्हणतात. आणि अज्ञान व मू्र्खता ज्ञानाचा प्रकाश आणून, सहानुभूती दाखवून दूर करता येतात.

४) जेव्हा व्यक्ती अज्ञान जिंकते, पुन:पुन्हा पश्चात्ताप करायला लावणा-या कर्माची शक्ती नष्ट करते, जेव्हा व्यक्ती निरिच्छ होते, ज्या वेळेस कशाचेही सुख-दु:ख वाटत नाही, जेव्हा पूर्ण प्रकाश प्राप्त झालेला असतो, अशा वेळेस ती व्यक्ती जणू निराळ्या अशा जगात जाते. ते नूतन जग साकार व निराकार अशा दोहोंपासून जेव्हा मुक्त असते. तेथे दु:खही नाही, आनंदही नाही. ती स्थिती मानवाला कल्पिता येणे शक्य नाही, ती स्थिती म्हणजे मुक्ती. ती स्थिती म्हणजे जन्ममरणाच्या फे-यातून सुटका. ती स्थिती म्हणजे निर्वाण. निर्वाणाचे स्पष्टीकरण करण्याचे बुद्ध नाकारीत. निर्वाण म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात फारसा अर्थ नाही. त्या निर्वाणदशेची वर्णने एक प्रकारे अर्थशून्यही असतील. ते निर्वाण वर्णायला वाणी असमर्थ आहे. परंतु असे ते निर्वाण कसे प्राप्त करुन घ्यावे, ही गोष्ट बुद्ध सांगतात. जे माझ्या मार्गाने येतील, त्यांना ‘याचि जन्मी. याचि डोळा’ ती कृतार्थ दशा प्राप्त होईल, ते धन्य दर्शन घडेल, असे बुद्ध सांगत आहेत. बुद्धांनी नानाविध विधींचे अवडंबर माजविले नाही. तपश्चर्या, देहदंडना, देव एक की अनेक, इत्यादी गोष्टींविषयी त्यांनी कधी काही सांगितले नाही. माझी पूजाअर्चा करा असेही कधी त्यांनी म्हटले नाही. बुद्ध हे सत्याचे शोधक, सत्याचे उपासक व उपदेशक आहेत. त्यांनी आपली शिकवण नैतिक नियमांनर उभारलेली आहे. त्यांच्या शिकवणीतील मध्यबिंदू, मुख्य प्राणमय वस्तू म्हणजे नैतिक जीवन. समकालीन तत्त्वज्ञानी वावदूकांजवळ आध्यात्मिक वादविवाद करताना ते दिसत नाहीत. जग अनंत आहे की सान्त आहे? अमर्याद आहे की समर्याद आहे? आदी आहे की अनादी आहे? हे जग दिक्कालाद्यनवच्छिन्न आहे की नाही? ज्याला सत्य ज्ञान मिळाले त्याचे विशिष्ट असे पृथक् अस्तित्व, व्यक्तित्व उरते की नाही? मरणोतातर त्याला जीवन आहे की नाही? इत्यादी प्रश्नांची चर्चा ते करु इच्छित नसत.