महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 10

जगातील असाधुतेला साधुत्वाने जिंकून घेण्याची ती एक नवीन साधना होती. क्रॉस स्वीकारणे म्हणजे ही नवीन दृष्टी घेणे, हा नवीन पंथ अनुसरणे. क्रॉस हाती घेणे म्हणजे स्वत:ला चिकटून असणारी अहंता दूर करणे; मोठेपणाच्या व वैभवाच्या ज्या ऐहिक कोत्या कल्पना त्या दूर फेकणे. सेंट पॉल आपणास आत्म्याला आवडणारी फळे देतो. प्रेम, आनंद, शांती, अनंत कष्ट, सौम्यता, स्निग्धता, चांगुलपणा, श्रद्धा, नम्रता, संयम इत्यादी गोष्टी तो देतो. हा आत्महंसाचा मौक्तिक चारा आहे. या आत्म्याच्या गोष्टीची तद्विरुद्ध अशा शारीरिक गोष्टींशी तो तुलना करतो. द्वेष, मत्सर, असूया, आसक्ती, आकारपूजा, क्रोध, झगडे, स्पर्धा, वितुष्टे, मारामा-या, ही अनात्म्याला, देहाला आवडणारी फळे. सेंट थॉमस अँक्विनास याने आयुष्याच्या अखेरच्या वर्षी अखंड समाधिसुख अनुभविले. त्याचा कार्यवाह रेजिनॉल्ड याने, ‘तुम्ही आणखी काही लिहा.’ असे त्याला परोपरीने सांगितले. परंतु त्याने नाकारले. ‘सौंदर्याचा साक्षात्कार’ या कवितेत कवी रॉबर्ट ब्रिजेस याने सेंट थॉमसच्या या समाधीचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे :

‘नेपल्स येथे एकदम भावमत्त होऊन तो पडला. जणू त्याची समाधी लागली. त्या प्रार्थनेच्या वेळेस मानवजातीच्या सर्व पापांपासून तो जणू मुक्त झाला असे मनात येऊन मला किती आनंद होत आहे! कारण त्यानंतर अँरिस्टॉटल किंवा ख्रिस्त यांच्याविषयी तो काही बोलत नसे, लिहित नसे. त्या भावान्मत्त स्थितीच्या वेळेस त्याला समोर का ख्रिस्त दिसत होता? अँरिस्टॉटल का दिसत होता? कोणीही दिसले असो; एक गोष्ट खरी, की पुनश्च एकही शब्द त्याने लिहीला नाही. त्याने दौत-टाक दूर सारली. त्या दिवशी तो श्रावणातीत झाला होता. अपुरे राहिलेले लिखाण त्याने पुरे करावे म्हणून रेनॉल्डसने आपली सारी मैत्री पणास लावली असती, खूप आग्रह त्याने केला असता. परंतु आपले बोलणे त्या भावोन्मत्ताला कळत कुठे होते? तो ऐहिकाच्या अतीत गेला होता. निराळ्या जगात होता. एकदम एक श्वास घेऊन तो रेनॉल्डसला म्हणाला, ‘हे बघ तुला मी एक गुप्त गोष्ट सांगतो. मी जीवंत असेपर्यंत ती तू कोणासही सांगू नकोस. माझे लिहिणे आता संपले. अशा काही दिव्य गोष्टीचा मला साक्षात्कार झाला आहे, की आजपर्यंत जे काही मी लिहिले वा शिकवले ते मला सारे क्षुद्र वाटत आहे. आणि माझ्या ईश्वरावर माझी श्रद्धा आहे. ज्याप्रमाणे माझी मते संपली. सांगणे-शिकविणे समपले, त्याचप्रमाणे हे जीवनही एकदाचे संपो...'

बुद्धांचे जीवन व त्यांची शिकवण यासंबंधी प्राचीनतम अशा परंपरेतून मिळणारा संशयातीत पुरावा आपण पाहिला. त्या वेळच्या धर्मिक जगात बुद्धांचा स्वभाव व त्यांची शिकवण नीट जुळती होती. त्याची ती मूर्तिमंत साधेपणाची वृत्ती, त्यांचे सेवामय प्रेम, सर्वांच्या सेवेस धावण्याचा स्वभाव, हाच त्यांनी दाखविलेला सुखाचा मार्ग. दु:खातून मुक्त होण्याचा त्यांनी जे हा साधा, प्रेममय नि सेवामय असा मार्ग दाखविला, त्यामुळेच त्यांना जगाचे उद्धारक असे म्हणण्यात येऊ लागले. त्यांचे समकालीन लोक ‘जगाते तारक’ अशा रितीने त्यांना संबोधू लागले. अंतिम प्रश्नाचे निश्चित उत्तर देण्याचे ते नाकारीत. कारण या  अंतिम प्रश्नाच्या  उत्तरांची नीट व्याख्या करणे अशक्य होते. परंतु बुद्धांच्या या करण्यामुळे पुढे मतमतांतरे फार माजली. ज्यांची वृत्ती अति उत्कट नाही, अशांसाठी जरा कमी तात्त्विक व कमी कडक असे नवीन प्रकार पुढे बुद्धधर्मात रुढ झाले. कारण अशांचीही धार्मिक तहान भागविणे प्राप्त होते.