महात्मा गौतम बुद्ध

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र


महात्मा गौतम बुद्ध : || तीन || 4

जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य हा जो महासिद्धांत, त्याच्या छायेखाली अनेक मतमतांतरे जन्माली आली. त्या त्या भक्तांचे दैवत परमात्म्याशी एकरुप केले जाई. अद्वैताची ती परिभाषा सर्वत्र वापरली जाई.

हे दृश्य नामरुपात्मक जगत् सत्य नाही, हा सिद्धांत बुद्ध स्वीकारतात. तसेच हा दृश्य जीवही शाश्वत नाही. जीव व जगत् या दोहोंतही एका अभंग कायद्याने सारखा बदल होत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे, की या सतत बदलणा-या कालबद्ध जीवनातून मुक्त होणे; या जीवनाच्या पलीकडे जाऊन निर्वाण प्राप्त करुन घेणे. बुद्धिप्रामाण्य न मानणा-या अनेक आग्रही धर्ममतांना बुद्ध किंमत देत नसत. परंतु या विश्वात खरोखर काही भावरुप, सद्रूप असे आहे की नाही; व्यक्तीत वा त्या निर्वाण-दर्शेत काही सत् असे की नाही, ते सांगण्याचे बुद्ध टाळीत. या जगातील जीवन किती अपूर्ण; येथे किती भेद, बंधने, दु:खे; आणि च्या मोक्षदशेत किती निस्सीम आनंद; असे उपनिषदे सदैव सांगत असतात. बुद्धांच्या व उपनिषदांच्या शिकवणीत फरक असलाच तर तो संसाराविषयीच्या, जगाविषयीच्या दृष्टीकोणांत नसून, मोक्षदशेसंबंधीच्या, निर्वाणासंबंधीच्या कल्पनेत आहे.

बुद्धांच्या मौनाचा अर्थ काय, या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी या मौनापाठीमागे असणा-या बुद्धांच्या हेतूकडे जरा वळू या. बुद्धांच्या शिकवणीचे सार नैतिक श्रेष्ठतेत आहे. जीवनासंबंधीच्या व विश्वासंबंधीच्या त्यांच्या कल्पना, त्यांच्या अत्यंत व्यावहारिक अशा कर्ममय दृष्टीकोणातून निघालेल्या आहेत. प्रत्येक वस्तूचे अस्तित्व कोणत्यातरी कारणावर अवलंबून असते. ते कारण दूर करु तर कार्यही दूर होईल. याज्ञिकांनी, धर्मोपाध्यायांनी बुद्धांच्या काळात यज्ञयागात्मक अगडबंब विधींचे उपाय सुचविले होते. परंतु त्यांनी रोग बरा होणार नव्हता. दु:खाचे मूळ उपटून टाकायचे असेल, तर हृदय शुद्ध करणे हा उपाय आहे. नीतीचा कायदा पाळणे हा उपाय आहे. त्या नीतीचे महत्त्व जी जी तत्त्वज्ञाने कमी लेखीत, ती सारी तत्त्वज्ञाने बुद्ध झुगारुन देत.

उपनिषदांची घोषणा जर सत्य असेल, जर आपण मुळात दैवी असू, तर आपणास मिळविण्यासारखे काय उरले? डोळ्यांसमोर ध्येय ठेवून तदर्थ धडपड करण्यासारखे काय राहिले? जैन व सांख्य तत्त्वज्ञान अनेक जीव मानतात. हे अनंत जीव प्रकृतीच्या पसा-यात पडलेले आहेत. यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी योगाचरणाचा मार्ग दाखविला.