अहंकारी असणे म्हणजे ज्याला अजून डोळे फुटले नाहीत अशा प्राथमिक अवस्थेतील अविकसित जीवाप्रमाणे असणे होय. केवळ स्वार्थ पाहणे म्हणजे दुस-या व्यक्तीच्या सत्यतेविषयी आंधळे असणे. आपल्या शारीरिक व मनोमय कोशांतून जेव्हा आपण बाहेर पडतो, स्वत:च्या शारीरिक इच्छा-वासनांच्या आसक्तींतून जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हाच आपली खरी वाढ होऊ लागली असे समजावे. वासना-विकारांनी बरबरटलेल्या अशा या दृश्य जगाचा जेथे मागमूसही नसतो, अशा त्या अति उदात्त व महनीय अशा स्थितीत आपल्या जीवनाची मुळे आहेत हे समजणे म्हणजे वाढू लागणे. अहंकारापासीन मुक्ती म्हणजे सर्व सजीव सृष्टीविषयी सौम्यवृत्ती होणे; सर्व सचेतन सृष्टीविषयी अति खोल व थोर सहानुभूती दाखविणे. अहंचा त्याग म्हणजे आपले संपूर्ण स्वरुप प्राप्त करुन घेणे; या विश्वाच्या सुसंवादी रचनेतील स्वत:चे निश्चित व व्यवस्थित स्थान जाणणे.
‘अहं’ शाश्वत व अभंग आहे असे बुद्ध मानीत नाहीत. तसेच मनुष्य मेला की सारे संपले हेही मत ते स्वीकारीत नाहीत. जर मरणाने सारा खेळ खलास होत असेल, तर मग आत्मसंयमन वगैरे करुन या क्षणभंगुर जीवनातील ओझे वाढवा का, असे पुष्कळांना वाटण्याचा संभव आहे. आपला हा अहंकारी जीवात्मा म्हणजे एक मिश्रण आहे. तो सदैव असतो, परंतु बदलत असतो.
अति दैवी गोष्टींचा विचार करु लागल्याने मनुष्याचे लक्ष नैतिक मूल्यांपासून चलित होते. त्याची शक्ती, त्याची एकाग्रता, यांना फाटेफुटतात. सभोवतालची प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्या नैतिक मूल्यांचा अधिकाधिक अनुभव घेणे ही गोष्ट बाजूस राहते. मनुष्याला ज्या शक्ती मिळालेल्या आहेत, त्यांचा उपयोग जीवनातील सत्यम्-शिवम्-सुंदरम् वाढविण्याकडे मनुष्य करीत नाही असे बुद्धांना दिसून आले. आणि याचे कारण काय? तर मनुष्य दुसरी कोणतीतरी दैवी शक्ती, बाहेरची शक्ती सारे करील, असे मानीत असतो. जे काम वास्तविक मनुष्याने करायचे असते, ते बाहेरची शक्ती करील असे जोपर्यंत तो मानतो, तोपर्यंत तो स्वत: आपल्या शक्तीचा उपयोग करून जीवन अधिक सुंदर व मंगल करावे म्हणून झटत नाही. बुद्धांना ही गोष्ट दिसून आली. काहीतरी दैवी चमत्कार होऊन एकदम आपला स्वभाव उदात्त व उन्नत होईल, असे मनुष्यास वाटत असते. परंतु बाह्य शक्तींवर विसंबणे, म्हणजे मानवी प्रयत्न सोडणे. बहुजन समाजाच्या दैवतांना बुद्ध नाकारीत नसत. परंतु हे देव नसून देवदूत आहेत असे ते म्हणत. या देवांना, या देवदूतांनाही स्वत:ला सुधारण्याची जरुरी असते; हे देव, देवदूतही दृश्य नाशिवंत वस्तूंपैकीच, असे बुद्ध समजत. बुद्धांच्या शिकवणीवरुन व प्रत्यक्ष त्यांच्या जीवनावरुन ते प्रसत्नशील, कर्मप्रवण अशा जीवनाचे पुरस्कर्ते दिसतात. सा-या विश्वाचे कायद्याने नियमन होत असते.