भगवान श्रीकृष्ण

साने गुरुजींनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्णांचे चरित्र.


भगवान श्रीकृष्ण 2

गोड बालपण
गोकुळातील वाढणारा जो श्रीकृष्ण त्याचे चरित्र काही अद्भुतरम्य आहे. कवींना या गोकुळातील गोपाळांचे-मुरलीधराचे, बन्सीधराचे वर्णन करताना कधी कंटाळा येत नाही. शुक्राचार्यांसारख्यास ते चरित्र वेडे करते झाले. मीराबाईला ते पागल करते झाले. चैतन्यरामकृष्ण यांस ते वेडे करते झाले.

'गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही देखा॥'

असे तुकारामसारख्यांनी सद्गदित व रोमांचित होऊन म्हटले. हे कृष्णाचे बालपण फार गोड आहे.

श्रीकृष्णाने गोकुळाला प्रेमस्वर्ग बनवले. स्वतः अंगावर घोंगडी टाकून, हातात काठी घेऊन, तोंडात बासरी धरून याने धेनू चारावयास जावे. इतर सर्व गोपाळबाळांत मिसळावे. गोकुळातील सर्व तरुण मुले त्याच्याभोवती यमुनातीरी जमत. तेथे तो खेळ मांडी. दुबळयांची बाजू कृष्ण घ्यायचा व त्यांचा पक्ष खेळात विजयी करायचा. लहानपणापासून तो पडलेल्यांची, दुबळयांची बाजू घेणारा; त्यांना हात देऊन, हाक मारून, हिम्मत देऊन उठवणारा, विजयी करणारा तो आहे. पेंद्या वगैरे रोडकी पोरे. त्यांचा सवंगडी म्हणजे कृष्ण. यमुनेच्या तीरावर तो सर्वांच्या शिदो-या एकत्र करावयाचा. कोणाचे जास्त लोणी, कोणाचे-कमी ते सर्व एकत्र करून सर्वांना वाटून द्यावयाचे. अशक्ताला जरा जास्तच वाटा द्यावयाचा. हा बाळकृष्ण गोकुळातील तरुण पिढीला प्रेम शिकवत होता. समानता शिकवत होता. बंधुभाव शिकवत होता. प्रत्यक्ष रोजच्या आचरणात ही तत्त्वे कशी आणावी ते शिकवत होता. या सर्व गोपाळांनी एकत्र आहे काला; एकत्र केले आहे भोजन. आणि मग यमुनेत त्यांनी हात धुतले. यमुनेच्या प्रवाहात जे भाकरीचे तुकडे, जे भाताचे कण मिसळले-ते खायला देव मत्स्यरूपाने अवतरले, असे भागवतात म्हटले आहे. कारण ते कण प्रेमाने भरलेले होते. देवांना त्या प्रेमाचा हेवा वाटे. अमृत पिणारे देव, पण या प्रेममय गुराख्यांच्या जेवणातील शेष कण मिळण्यासाठी अधीर होत !