भगवान श्रीकृष्ण

साने गुरुजींनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्णांचे चरित्र.


भगवान श्रीकृष्ण 13

कर्माची साधने सारी पवित्र
अशा प्रकारे मी जे कर्म करतो, भगवंताला अर्पण करायच्या दृष्टीने जे कर्म करतो, ते पवित्र आहे. आणि म्हणूनच त्या कर्माची सकल साधने तीही मला पवित्र आहेत, वंद्य आहेत. ज्या यंत्राने मी सतरंजी विणतो, तो पंजा मला पूज्य आहे. तो मी फेकणार नाही. त्याला जपून वापरीन, त्याला तेल लावीन. स्वच्छ, निर्मळ राखीन. ज्या मागावर मी विणतो, तो माग मला पूज्य आहे. ज्या चरख्यावर मी सूत काततो तो चरखा मला पूज्य आहे. त्याची हेळसांड करणार नाही. त्यांची माळ नीट ठेवीन, चाक नीट ठेवीन. त्याला तेल घालीन. ज्या टकळीवर मी सूत काततो ती मला पूज्य आहे. तिला माझा पाय मी लावणार नाही. ज्या झाडणीने मी केर काढतो, त्या झाडणीला मी केर काढल्यावर नीट ठेवीन. तिला पाय लावणार नाही. केरसुणीला जर कोणी पाय लावला तर बायका किती रागावतात ! तिला नमस्कार कर, असे सांगतात. समईला, दिव्याला पाय लागला तर भारतीय माता मुलाला नमस्कार करायला लावतात. अर्जुनाच्या गांडीवाला जर कोणी नाव ठेवले तर अर्जुन त्यास मारावयास उठे. त्याला ते गांडीव इतके पूज्य वाटे ! क्षत्रिय लोक धनुष्याच्या नावाने शपथ घेत असत. यातील अर्थ हाच, माझ्या शेतीचे साधन बैल, तोही मला पूज्य; गाय तीही पूज्य; एवढेच नव्हे तर पहाटेच्या वेळेस कुऊ कुऊ करणारी कोकिळा, प्रभात काळी त्या उत्कट आवाजाने माझे हृदय सद्गदित करणारी कोकिळा, तीही मला पूज्य. कोकिळाव्रत मी तिच्यासाठी करीन. माझ्या शेतीची राखण करणारे नाग, उंदरांना दूर ठेवणारे नाग, त्यांनाही मी नागपंचमीला पुजीन. माझ्या कर्मात, परमेश्वराच्या पूजाकर्मात असणारी, सर्व साधने-ती मला पूज्य आहेत. सेवेसाठी माझे शरीर थंडी-वा-यात सांभाळून ठेवणारा अंगावरचा हा सदरा, हा मला पूज्य आहे. हा मळला तर धुवीन, फाटला तरी शिवीन. ज्या भांडयात मी जेवतो, स्वयंपाक करतो ती माझ्यासाठी मलिन झाली, तर त्यांना मी उजळून स्वच्छ करून ठेवीन. एका जपानी शेतक-याने एकदा एक लेख लिहिला होता. त्यात तो म्हणतो, ''मला उद्या स्वयंपाक करावयाचा नसला म्हणून मी आजची भांडी तशीच खरकटी, धुराने काळी झालेली, माझ्या सुखासाठी मलिन झालेली अशी राखू का? उद्या मला वाचावयाचे नसले, तरी ज्या कंदिलाजवळ मी आज रात्री वाचले, जो कंदील धुराने काळा झाला, तो तसाच ठेवू का? नाही. मी ती भांडी कृतज्ञतेने घाशीन. मी तो कंदील कृतज्ञ राहून पुशीन.'' केवढी ही थोर भावना आहे ! भारतीय संस्कृतीत ही भावना खेळवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण विजयादशमीच्या वेळेस किंवा नवरात्रात आयुधांची पूजा करतो. वीर तरवारीची पूजा करतो. वाणी तराजू, वजने यांची पूजा करतो. ब्राह्मण ग्रंथांची पूजा करतो. प्रत्येकाच्या कर्माची-ईश्वराची पूजा करण्याची-समाजदेवाची सेवा करण्याची-जी साधने, तीही आपण पूज्य मानली आहेत. प्रातःकाळच्या प्रार्थनेच्या वेळेस 'पादस्पर्श क्षमस्व मे' असे भूमातेला आपण म्हणतो. तिच्यावरून आपण चालतो, थुंकतो, तिला मलिन करतो म्हणून तिची क्षमा. ती देवता आहे. माता आहे. तिला सारवले पाहिजे, धुतले पाहिजे. माझ्या राहण्याने मलिन होणारी खोली मी स्वच्छ केली पाहिजे, तिला वंदन केले पाहिजे. शिळासप्तमीच्या दिवशी आपणासाठी तीनशेसाठ दिवस तापणारी, काळी होणारी चूलमाई तिला विश्रांती देतो. आदल्या दिवशी रसोई तयार करून ठेवतो. ते शिळे आपण खातो. त्या दिवशी चूल म्हणजे देवता ! तिला सारवतो. तिच्यात आंब्याचा लहान रोपा तिला सावली देण्यासाठी लावतो. आज तिची पूजा असते. अशा रीतीने माझ्या कामात सहाय्यभूत होणारी जी सजीव-निर्जीव साधने, ती मला पूज्य व पवित्र आहेत. ज्या भगवंताची मला पूजा करावयाची आहे, तो भगवंत या साधनांतही मी पाहतो. तुकाराम म्हणतात, ''विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी-'' माझी भजन करण्याची झांज, माझ्या खांद्यावरची पताका-आणि हा भजन करणा-यांचा मेळावा सर्व विठ्ठलच आहे. कारण ही साधने विठ्ठलाकडे नेणारी आहेत.