अंतःकरणातील वेणू
परंतु असे कर्म हातून होणे कठीण आहे. त्याच्यासाठी संयम हवा, अभ्यास हवा, निश्चय हवा, प्रयत्न हवा. अंतःकरणात व्यवस्था लावण्याचा, संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. मागील उपवासाच्या वेळी-अग्निदिव्याच्या वेळी महात्माजींनी म्हटले होते, ''आज पन्नास वर्षांच्या सेवेने मी माझ्या अंतःकरणात व्यवस्था निर्माण केली आहे. संयमाने, तपस्येने तेथे असणारा बेसूरपणा दूर केला आहे. म्हणून मला तो आतील मंजुळ आवाज ऐकू येत आहे. ती आतील कृष्णाची मुरली ऐकू येत आहे. ती मनात सांगत आहे, 'कचरू नको, नीट पुढे जा.'' आपल्या अंतःकरणातही अशी व्यवस्था लावण्यास, असे संगीत निर्माण व्हावयास, कृष्णाची ही हृदयंगम वेणू हृदयवृंदावनात ऐकू येण्यास त्याग, तपस्या, सेवा यांचे मार्ग अवलंबले पाहिजेत. आपण धडपड करू या. उत्कंठेने झगडू या. हेच जीवन आहे. एक दिवस, आज ना उद्या-शत-जन्मांनी, सुंदर मुरली आपल्या हृदयात ऐकू येईल. मग मोह आड येणार नाहीत. मुरलीचा सूर नेईल तिके सा-या इंद्रियगायी निमूटपणे आनंदाने येतील. एक दिवस तो येईल !
परंतु तो दिवस येईपर्यंत माझ्या हृदयात ऊर्मी उठत राहणार. माझ्या हृदय-यमुनेवर कधी क्रोधाच्या, कधी प्रेमाच्या, कधी उत्साहाच्या, कधी निराशेच्या लाटा उसळत राहणार. वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन गोकुळात जात होता. यमुनेच्या प्रवाहातून जात होता. श्रीकृष्णाच्या परम पवित्र पायाचा स्पर्श होऊन आपण पवित्र व्हावे, असे यमुनेला वाटत होते. ती वर वर उचंबळून येत होती. तो तो वसुदेव त्या बाळकृष्णाला वर वर उचली. शेवटी कृष्णाने वस्त्रातून पदांगुली लांबवून यमुनेला स्पर्श केला. यमुना शांत झाली. त्याचप्रमाणे माझी जीवनयमुना त्या ध्येय भगवानाच्या पायांवर, त्या ध्येयरूप श्रीकृष्णाच्या पायांवर स्वतःला ओतण्यासाठी अधीर आहे. शांत होण्यासाठीच वादळ उठते. परमेश्वराच्या विश्वरूपाच्या पायांवर पडून शांत होण्यासाठीच माझी जीवन-यमुना उचंबळत आहे. तिच्या लाटा उसळत आहेत. संगीत निर्माण करणा-या भगवंताच्या पायाला स्पर्श करण्यासाठी मी धडपडत आहे. येईल, एक दिवस येईल ! ज्या दिवशी गोकुळात प्रेमराज्या स्थापणा-या, अव्यवस्थार, गोंधळ दूर करून मुरली वाजवणा-या त्या कन्हैयाच्या पायाचा स्पर्श या जीवन-यमुनेस होईल व ती शांत स्थिर, गंभीर होईल.
अंतःकरणातील शेकडो प्रवृत्तींना आकर्षून घेणारा, त्यांना ओढणारा, त्यांचे यथार्थ स्वरूप कळण्यासाठी त्या त्या प्रवृत्तींच्या आत काय काय हेतू आहेत हे नीट पाहण्यासाठी त्या प्रवृत्तींना उघडया करणारा, त्या प्रवृत्तींच्या अंगावरची खोटी, दांभिक, लाक्षणिक, लपवालपवीची वस्त्रे दूर करणारा व त्या त्या प्रवृत्तींना त्यांचे यथार्थ रूप उघडे करून लाजवणारा, मग नमवणारा, त्यांची योग्य किंमत त्यांस पटवणारा, त्यांना शोभेशी वस्त्रे त्यांना देणारा व त्या सर्वांना एका ध्येयाचे संगीत गायला लावणारा-असा जो अंतःकरणातील जोम, ही जी स्फूर्ती, ही जी दीप्तिज्ञप्ती ती श्रीकृष्णाची मूर्ती होय.