तुकाराम गाथा

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.


तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३९०१ ते ४०००

३९०१

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥

सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥

रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥

तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥

३९०२

कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥

भक्त जाय सदा हरि कीर्ति गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥

त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥

नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मार्गा चालताहे संगें हरि ॥३॥

तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥

३९०३

बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥

आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥

नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥

तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥

३९०४

हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥

न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥

असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥

तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥

३९०५

दसरा दिवाळी तो चि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥

आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥

धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥

तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥

३९०६

खिस्तीचा उदीम ब्राम्हण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥

वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥

मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥२॥

आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥

तुका म्हणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥

३९०७

जगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥

आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥

उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥

तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥३॥

३९०८

हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥

हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥

डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥

बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥

बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥

तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥

३९०९

जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥

मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥

तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥

तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥

३९१०

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥

त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥

बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥

शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥

तुका म्हणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥

३९११

पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥

भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥

तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥

३९१२

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥

अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥

तुका म्हणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥

३९१३

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥

देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥

मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता म्हणों नये ॥२॥

वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥

तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥

३९१४

मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥१॥

काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥

नाना छंद अंगीं बैसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥

तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥

३९१५

जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥

काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥

तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥

अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥

तुका म्हणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥

३९१६

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥

आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥

संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं म्हणती एक ॥२॥

बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥

न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥

न जावें देउळा म्हणती देवघरीं । बुडविलें या परी तुका म्हणे ॥५॥

३९१७

नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥

संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥

न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ती गोड काज आणीक नाहीं ॥२॥

करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥

महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥

तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥

३९१८

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥

निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥

तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥

३९१९

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥

सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥

तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥

३९२०

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥

घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥

पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नर्क लोका ॥३॥

३९२१

कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥

पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥

तुका म्हणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥

३९२२

दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥

उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥

चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यास यम दंडी ॥३॥

३९२३

होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥

शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥

तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥३॥

३९२४

लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥

नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥

तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥

३९२५

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥१॥

परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥

जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥

३९२६

स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥

यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥

ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥

३९२७

न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥

म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥

काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥

तुका म्हणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥

३९२८

तुझा म्हणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥

अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥

तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥

तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥

३९२९

जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥

सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥

तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा सीण जन्मांतर ॥३॥

३९३०

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥

कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥

तुका म्हणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥

३९३१

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥

न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥

तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥

३९३२

तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥

अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥

तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥

३९३३

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥

देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥

निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥

तुका म्हणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥

३९३४

माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥

तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥

पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥

तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥

३९३५

तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥

येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥

ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥

तुका म्हणे भेदा । करुनि करितों संवादा ॥३॥

३९३६

तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥

ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥

बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥

दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥

३९३७

माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥

धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥

करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥

तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥

३९३८

जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥१॥

परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥

तुझें नाम अमोलिक । नेणती हे ब्रम्हादिक ॥२॥

ऐसें नाम तुझें खरें । तुका म्हणे भासे पुरें ॥३॥

३९३९

सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥

नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥

द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि घ्यावें जीवें ॥२॥

तुका म्हणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥

३९४०

गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥

त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥

श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥

तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥

३९४१

सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥

स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥

सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥

तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥

३९४२

आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥

दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥

तुका म्हणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

३९४३

अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥

काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥

जो स्मरे रामराम । तयासी म्हणावें रिकामें ॥२॥

जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावें भिकारी ॥३॥

तुका म्हणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥

३९४४

या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥

गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥

सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥

प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥

पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥

तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥

३९४५

उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥

होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥

येइल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥

भक्तीप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥

यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥

तुका म्हणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥

३९४६

माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥

कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥

मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥

तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥

३९४७

भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा ॥१॥

सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥

काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥

तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥

३९४८

जातीचा ब्राम्हण । न करितां संध्यास्नान ॥१॥

तो एक नांनवाचा ब्राम्हण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥

सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥२॥

नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥३॥

तुका म्हणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥४॥

३९४९

जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥

करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥

जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥२॥

तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥

३९५०

आम्हां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥१॥

आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥

अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥२॥

तुका म्हणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥३॥

३९५१

मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥

तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥

कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥

नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥

अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥

तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥

३९५२

जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥

आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥

कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥

तुका म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥३॥

३९५३

जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥

तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥

गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरि लोळे ॥२॥

प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥

तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥

३९५४

तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥

वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥

ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥

तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥

३९५५

कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥

तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥

वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥

ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥३॥

मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥४॥

३९५६

सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥

धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥

विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥

तुका म्हणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ ॥३॥

३९५७

भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥१॥

अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥

नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥

रिद्धि सिद्धी ज्या कामारी । तुका म्हणे ज्याचे घरीं ॥३॥

३९५८

ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥

येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥

गोडी प्रियापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥

तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥

३९५९

बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥

तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥

नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥

भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥

त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥

नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥

३९६०

हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥

बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥

मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥

धन्य म्हणे आतां । येथें नुधवा माथां ॥३॥

अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥

३९६१

किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥

एका घाई न करीं तुटी । न निघें दवासोई भेटी ॥ध्रु.॥

सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥२॥

सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥३॥

३९६२

कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥

बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥

परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥

तुका म्हणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥३॥

३९६३

साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥

मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥

दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥

तुका म्हणे आत्मनष्टि । भागे चेष्ट मनाची ॥३॥

३९६४

घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥

आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥

सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥

तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥

३९६५

आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥

तुम्हांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥

दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥२॥

तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥

३९६६

अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी ॥१॥

नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥

नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥

तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥३॥

३९६७

आम्ही हरिचे हरिचे । सुर कळिकाळा यमाचे ॥१॥

नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥

आम्ही हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥२॥

आम्ही हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥३॥

तुका म्हणे आम्हांवरी । सुदर्शन घरटी करी ॥४॥

३९६८

देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥

न घेई माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥

मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥

तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥

३९६९

पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥

नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥

विष्णुदासां गति नाहीं तरावया । म्हणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥

धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥

तुका म्हणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥

३९७०

वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥

चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥

लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥

तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥

३९७१

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥

प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥

सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥

तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥

३९७२

निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥

तैसा आम्हासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥

मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥

दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥

पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥

३९७३

श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥

भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥

तुका म्हणे आम्हां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥

३९७४

सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥

सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥

आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥

तुका म्हणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥

३९७५

जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥

वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥

हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥

तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असतां कळिकाळ पायां तळीं ॥३॥

३९७६

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥

तृण नाहीं तेथें पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥

तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥

३९७७

याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥

ब्रम्हहत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥

तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापार । म्हणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥

३९७८

पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥

तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥

कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥

जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥

जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥

३९७९

कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥

कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥

जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥

केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे कर्म । जाळोनियां तरसी ॥३॥

३९८०

तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥

दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥

देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥

तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥

३९८१

कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥१॥

काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥

काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुम्ही देवा ॥२॥

तुका म्हणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥३॥

३९८२

माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥

अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥

मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥

ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥

माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥

तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥

तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥

३९८३

कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥

तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥

वत्साचिये आसे । धेनु धांवेना गोरसें ॥२॥

तुका म्हणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥

३९८४

भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥

जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥

तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥

३९८५

तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥

सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥

उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥

तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥

३९८६

अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तमु ॥१॥

जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥

अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥

तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥

३९८७

मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप ॥१॥

जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥

तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥

३९८८

धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ध्रु.॥

नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥

भाविक हो येथें धरा रे आवांका । म्हणे दास तुका शुद्धयाति ॥३॥

३९८९

अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥१॥

अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥

फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका म्हणे नये सवें कांहीं ॥३॥

३९९०

संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥

अवघीं च इंद्रियें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥

शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥

तुका म्हणे सार हरिनामउच्चार । येर्‍हवी येरझार हरीविण ॥३॥

३९९१

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥

जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥

तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥

३९९२

भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥

नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥

सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥

सर्वस्वें त्याचा म्हणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥

तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥४॥

३९९३

राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥

तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥

तुका म्हणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥

३९९४

हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥

अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥

तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥

३९९५

गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥

संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥

साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥२॥

निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥

तुका म्हणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥

३९९६

भाव धरिला चरणीं म्हणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥

करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥

धरिले निश्चळि न सोडीं ते पाय । तुका म्हणे सोय करीं माझी ॥३॥

३९९७

तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥

येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥

माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥

अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥

तुका म्हणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥

३९९८

आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥१॥

तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥

नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भक्तांची प्रीति तुम्हां ॥२॥

परि आम्हांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥३॥

तुका म्हणें तैसें तुज काय उणें । देई दरुषण चरणांचें ॥४॥

३९९९

करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥

जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥

शरणागतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥२॥

तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥

४०००

आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥

सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥

अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥

तुका म्हणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥