स्तोत्रे १

सर्व स्तोत्रे या वर्गात आहे.


श्री व्यंकटेश स्तोत्र १

श्री गणेशाय नम: |
श्री व्यंकटशाय नम: ||

ॐ नमो जी हेरंबा |
सकळादि तू प्रारंभा |
आठवूनी तुझी स्वरूपशोभा |
वंदन भावे करीतसे || १ ||

नमन माझे हंसवाहिनी |
वाग्वरदे विलासिनी |
ग्रंथ वदावया निरुपणी |
भावार्थखाणी जयामाजी || २ ||

नमन माझे गुरुवर्या |
प्रकाशरूपा तू स्वामिया |
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया |
जेणे श्रोतया सुख वाटे || ३ ||

नमन माझे संतसज्जना |
आणि योगिया मुनिजना |
सकळ श्रोतया साधुजना |
नमन माझे साष्टांगी || ४ ||

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक |
महादोषांसी दाहक |
तोषुनिया वैकुंठनायक |
मनोरथ पूर्ण करील || ५ ||

जयजयाजी व्यंकटरमणा |
दयासागरा परिपूर्णा |
परंज्योती प्रकाशगहना |
करितो प्रार्थना श्रवण कीजे || ६ ||

जननीपरी त्वां पाळिले |
पितयापरी त्वां सांभाळिले |
सकळ संकटांपासुनि रक्षिले |
पूर्ण दिधले प्रेमसुख || ७ ||

हे अलोलिक जरी मानावे |
तरी जग हे सृजिले आघवे |
जनक जननीपण स्वभावें |
सहज आले अंगासी || ८ ||

दीननाथा प्रेमासाठी |
भक्त रक्षिले संकटी |
प्रेम दिधले अपूर्व गोष्टी |
भजनासाठी भक्तांच्या || ९ ||

आता परिसावी विज्ञापना |
कृपाळुवा लक्ष्मीरमणा |
मज घालोनि गर्भाधाना |
अलोलिक रचना दाखविली || १० ||

तुज न जाणता झालो कष्टी |
आता दृढ तुझे पायी घातली मिठी |
कृपाळुवा जगजेठी |
अपराध पोटी घाली माझे || ११ ||

माझिया अपराधांच्या राशी |
भेदोनी गेल्या गगनासी |
दयावंता हृषीकेशी |
आपुल्या ब्रीदासी सत्य करी || १२ ||

पुत्राचे सहस्र अपराध |
माता काय मानी तयाचा खेद |
तेवी तू कृपाळू गोविंद |
मायबाप मजलागी || १३ ||

उडदांमाजी काळेगोरे |
काय निवडावे निवडणारे |
कुचलिया वृक्षांची फळे |
मधुर कोठोनी असतील || १४ ||

अराटीलागी मृदुता |
कोठोनी असेल कृपावंता |
पाषाणासी गुल्मलता |
कैशियापरी फुटतील || १५ ||

आपादमस्तकावरी अन्यायी |
परी तुझे पदरी पडिलो पाही |
आता रक्षण नाना उपायी |
करणे तुज उचित || १६ ||

समर्थांचे घरीचे श्र्वान |
त्यासी सर्वही देती मान |
तैसा तुझा म्हणवितो दीन |
हा अपमान कवणाचा || १७ ||

लक्ष्मी तुझे पायांतळी |
आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी |
येणे तुझी ब्रीदावळी |
कैसी राहील गोविंदा || १८ ||

कुबेर तुझा भांडारी |
आम्हां फिरविसी दारोदारी |
यात पुरुषार्थ मुरारी |
काय तुजला पै आला || १९ ||

द्रौपदीसी वस्त्रे अनंता |
देत होतासी भाग्यवंता |
आम्हांलागी कृपणता |
कोठोनी आणिली गोविंदा || २० ||

मावेची करुनी द्रौपदी सती |
अन्ने पुरविली मध्यराती |
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती |
तृप्त केल्या क्षणमात्रे || २१ ||

अन्नासाठी दाही दिशा |
आम्हां फिरविसी जगदीशा |
कृपाळुवा परमपुरुषा |
करुणा कैशी तुज न ये || २२ ||

अंगीकारी या शिरोमणि |
तुज प्रार्थितो मधुर वचनी |
अंगीकार केलिया झणी |
मज हातींचे न सोडावे || २३ ||

समुद्रे अंगीकारीला वडवानळ |
तेणे अंतरी होतसे विहवळ |
ऐसे असोनी सर्वकाळ |
अंतरी साठविला तयाने || २४ ||

कूर्मे पृथ्वीचा घेतला भार |
तेणे सोडीला नाही बडिवार |
एवढा ब्रम्हांडगोळ थोर |
त्याचा अंगीकार पै केला || २५ ||