श्री दत्त अवतार

श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.


उद्भव आणि उगम

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू . संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे.