बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.
श्री दत्त अवतार
श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.