भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावत माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.
श्री दत्त अवतार
श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.