देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी श्रीगणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । मथां शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलाची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंद शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥