देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी मारुतीची

उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहुं चला ।
ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥
आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथें विघ्न काय करी ।
दॄढ धरा हो अंतरीं । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥
आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडीं ।
त्याचे भजनाचे आवडी । दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥
थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।
रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥