देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दसांचे ॥ १ ॥
रामे तटका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षीलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥