देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी श्रीविष्णूची

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥
माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥
केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥
पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥