देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी शंकराची

धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती ।

धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु०॥

धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ ।

धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥१॥

धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ ।

धवळें हातीं नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥

धवळा सर्वांगें आपण । धवळें विभूतीचें लेपन ।

धवळें गात्र धवळें वसन । धवळें वाहन नंदीचें ॥३॥

धवळें कैलास भुवन । धवळें मध्यें सिंहासन ।

धवळें शंकराचें ध्यान । दास चिंतन करीतसे ॥४॥