देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी दशावतारांची

जन म्हणा हो श्रीहरि । प्रातःकाळीं स्मरण करी ।

तेणें तराल भवसागरीं । हा निर्धार भंरवसा ॥ध्रु०॥

वेद नेले निशाचरीं । मत्स्यरुप झाले हरी ।

कार्य ब्रह्मयाचे करी । शंखासुर वधोनियां ॥१॥

दैत्य मातले भूमंडळी । पृथ्वी नेली रसातळीं ।

कूर्मरुपी हो वनमाळी । पृष्ठीं धरिली मेदिनी ॥२॥

मही डळमळी पहा हो । देव झाले वराह हो ।

मग वधियेले दैत्य दानवो । पृथ्वी दाढे धरोनियां ॥३॥

पुत्र पित्यानें गांजिला । तो हा नरहरि स्मरता झाला ।

स्तंभीं अवतार धरियेला । भक्त रक्षिला प्रह्‌लादा ॥४॥

याग करितां झाला बळी । इंद्र कांपिन्नला चळचळीं ।

वामनरुपी हो वनमाळी । धाली पाताळीं बळीराजा ॥५॥

रेणुके उदरीं भार्गव झाले । राजे समस्त संहारिले ।

राज्य ब्राह्मणा दीधलें । सुखी केले भूदेव ॥६॥

सूर्यवंशी रघुनंदन । वानर सैन्य मिळवून ।

सागर पाषाणीं बांधून । संहारिलें राक्षसां ॥७॥

कारागृहीं अवतरले । श्रीकृष्ण गोकुळीं वाढिन्नले ।

कंसचाणूर मर्दिले । राज्य स्थापिलें उग्रसेना ॥८॥

बौद्ध अवतार धरियेला । जन हा बहुत कष्टी झाला ।

मग कलीस वरा दीधला । आपण राहिले निद्रिस्थ ॥९॥

पुढें कलंकी होणार । ऐसा शास्त्राचा निर्धार ।

मग फिरेल भवसंदेह । या हो विश्वजनाचा ॥१०॥

दशावतारांची भूपाळी नित्यस्मरा प्रातःकाळीं ।

दास म्हणे हो भूमंडळी भाग्यवंत होतील ॥११॥