गीत महाभारत
महर्षी व्यास Updated: 15 April 2021 07:30 IST

गीत महाभारत : दुर्योधनाचे बेत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.

द्रौपदीस्वयंवर   कृष्णाची अग्रपूजा

द्रौपदी विवाहानंतर दुर्योधनाला पांडव जिवंत असल्याचे समजले. तो अत्यंत निराश झाला. या विवाहामुळे पांडवांचे बळ वाढले होते; त्यांना द्रुपद व कृष्ण या दोन बलाढय शक्‍तींचे साहाय्य लाभले होते. शत्रू दुर्बल व्हावा अथवा त्याचा नाश करावा म्हणून दुर्योधनाने अनेक कुटिल प्रयत्‍न केले होते. आता आपल्याला राज्य मिळेल की नाही ही शंका त्याला भेडसावू लागली. त्याने कौरवसभेत आपल्या मनातील पांडवनाशासाठी आणखी काही कुटिल बेत सर्वांसमोर मांडले. धूर्त ब्राह्मनांच्या द्वारा कुंतीपुत्र व माद्रीपुत्र यांच्यात फूट पाडावी किंवा द्रुपद राजास द्रव्याची लाच देऊन पांडवांपासून दूर करावा. अथवा पांडवांच्या मनात द्रौपदीविषयी विष पेरुन त्यांच्यात कलह निर्माण करावा अशा या बेतांना कर्णाने विरोध केला. त्यांच्याशी ते शक्‍तिशाली होण्यापूर्वी सरळ युद्ध करावे अशा या बेतांना कर्णाने विरोध केला. त्यांच्याशी ते शक्‍तिशाली होण्यापूर्वी सरळ युद्ध करावे असा सल्ला त्याने दिला. बरीच चर्चा झाली, भीष्मांनी हे सर्व चुकीचे असल्याचे सांगून त्यांनाही राज्यातील अर्धा वाटा द्यावा असे ठासून सांगितले. त्याप्रमाणे त्यांना सन्मानाने बोलावण्यात आले व युधिष्ठिराला खांडवप्रस्थाचे राज्य देण्यात आले.

दुर्योधनाचे बेत

शत्रू हे पुन्हा कसे उभे ठाकले ?

अग्नीच्या ज्वाळांतुन कसे वाचले ? ॥धृ॥

स्वयंवरी तेच सफल जाहले कसे ?

ग्रस्त चित्त चिंतेने आज होतसे ?

राज्याचे स्वप्‍न पुन्हा आज भङ्‌गले ॥१॥

मूर्ख, दुष्ट काय म्हणू त्या पुरोचना

मार्गातिल कण्टक हे ठेविलेच ना

दैवाने पारडेच उलट फिरविले ॥२॥

दाविन मी माझे बळ पांडुसुतांना

नाशाचे कुटिल बेत रचिन मी पुन्हा

कर्णा हे मी उपाय मनी योजिले ॥३॥

वश करुनी द्रव्याने द्रुपदनृपाला

विनवावे सोड अता धर्मसुताला

युधिष्ठिरा, द्रुपदनृपा करु वेगळे ॥४॥

घात करु भीमाचा हेर योजुनी

पार्थावर मात करिल कर्ण शरांनी

राज्य मागण्यास त्यास धैर्य ना उरे ॥५॥

पाचाही पतिविषयी राणिच्या मनी

पेरावे संशयबिज कानी लागुनी

होइल संसार नष्ट या विषामुळे ॥६॥

पाठवु या रुपवती तरुण अंगना

लावू या नादी त्या कुंतिसुतांना

राहिल मग ऐक्य कसे पांडवांतले ? ॥७॥

हेर फसवतील तया करुनिया स्तुती

भ्रांतचित्त होतिल ते पाचही पती

कलहातच राहतील सदा गोवले ॥८॥

द्रुपद कृष्ण पार्थांना मित्र लाभले

नच बलिष्ठ ते अजुनी परी जाहले

तत्पूर्वी पाहिजेत डाव खेळले ॥९॥

. . .