गीत महाभारत
महर्षी व्यास Updated: 15 April 2021 07:30 IST

गीत महाभारत : कर्णाचे कुंतीला उत्तर

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.

कुंती-कर्ण-संवाद   शिखण्डीचे वृत्त

आपल्या मातेचे कळकळीचे शब्द ऐकताच कर्ण विचारमग्न झाला. तो वेदशास्त्र जाणणारा, नियमनिष्ठ व कर्तव्यकठोर वृत्तीचा होता. त्याला जीवितापेक्षा कीर्ती अधिक महत्त्वाची वाटते. भावनेपेक्षा त्याने कर्तव्यावर अधिक भर दिला आहे. कृष्णाला उत्तर दिले त्यावेळीही असाच पेच होता. आता तर आदरणीय जन्मदात्र्या मातेच्या शब्दाचा प्रश्न होता. सामाजिक निंदा व पित्याच्या कीर्तीला येणारे लांच्छन यामुळे तिने त्याचा त्याग केला व ही गोष्ट तिने जगापासून लपविली. पण त्यामुळे कर्णाला एक सूत म्हणून अपमान सहन करीत जीवन जगावे लागले. म्हणून कर्णाने सुरवातीला तिला दोष दिला. पण नंतर आपली अगतिकता स्पष्ट केली. राजाच्या उपकाराची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याने त्याने मातेला जरी नम्र नकार दिला तरी चार पांडवांना अभयदान देऊन मातृकर्तव्य चांगल्या तर्‍हेने निभावले. कुंतीला मात्र दुःख झाले. ती थरथर कापू लागली. पुत्राला आलिंगन देऊन एवढेच म्हणाली की कर्णा अभयवचन लक्षात ठेव.

कर्णाचे कुंतीला उत्तर

कर्ण -

जीवन माझे माते अगतिक

काय देउ प्रतिसाद, तुजसी, काय देउ प्रतिसाद ? ॥धृ॥

ज्यांच्यासाठी मन तळमळले

आज पाहिली मातृपाउले

वंदनीय ही आज माउली आली दृष्टिपथात ॥१॥

तुझे किती गे मन हे निष्ठुर

सोडलेस तू मज लाटांवर

अवमानाचे घाव झेलुनी जगलो मी सूतात ॥२॥

सूर्यपुत्र मी माते कळले

सूर्यदेवही नभी बोलले

तुझे वचन पाळण्या परी गे बळ नाही माझ्यात ॥३॥

कळता माझे मला राजकुळ

मनात उठले मोठे वादळ

कर्तव्याला स्मरुन मिटविले, त्याला मी हृदयात ॥४॥

आलिस माते मध्याह्नीला

राधेयाचे वंदन तुजला

ठरलो मी क्षत्रीय जीवनी अखेरच्या पर्वात ॥५॥

भावाभावामधले संगर

पाहुन झाली तू चिंतातुर

तुझ्या मनातिल हेतू द्यावी मी पार्थाला साथ ॥६॥

धार्तराष्ट्र मज मानित आले

मानासह मज वित्त अर्पिले

विसरुन सारे कसा येउ मी धर्माच्या पक्षात ? ॥७॥

जये मुकुट मज दिला शिरावर

सख्य वाहिले त्या नृपतीवर

ऋण फेडाया लढणे मजला, घेऊन प्राण हातात ॥८॥

वेळ ठेपली ही युद्धाची

भिस्त मजवरी सुयोधनाची

त्यास सोडता, ’भित्रा’ म्हणतिल योद्‌ध्वांच्या जगतात ॥९॥

मोलाची ही भेट मानितो

अभय-वचन मी चौघा देतो

अर्जुन सोडुन, प्राण न घेईन, मी त्यांचे समरात ॥१०॥

लढेन मी गे सव्यसाचिशी

दोघांचीही प्रतिज्ञा तशी

अर्जुन मी वा धरुन पुत्र गे पाच तुझे उरतात ॥११॥

कुंती -

सोडत ना तू सुयोधनाला,

दैवापुढती इलाज कसला ?

दुःख आजवर भोगित आले पुढे तेच नशिबात ॥१२॥

नाहि बिंबले तुझ्या मनावर

वचन असे रे माझे हितकर

अभयवचन जे दिलेस पुत्रा, ठेव तुझ्या स्मरणात ॥१३॥

. . .